नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर सुरक्षा विभागानेही कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी फळ मार्केटमधून दोन गोणी गुटखा जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे गुटखा पुरवठादारांचे धाबे दणाणले आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतरही बाजार समितीच्या भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील पानटप-यांवर मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातो.याठिकाणी कारवाई केलेला माल गुन्ह्यात न दाखविण्यासाठी आरोपीकडून लाच मागितल्याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयाला अटक केली आहे. एका कँटीन चालकावरही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे बाजार समिती आवारामध्ये खळबळ उडाली आहे. बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनीही सुरक्षा विभागाला मार्केट आवारामध्ये गुटखा विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. अन्न व औषध प्रशासनाची वाट पाहू नये. गुटखा विक्रीसाठी बंदी आहे. मार्केटमधील पानटपºया व स्टॉलवर हा माल आढळल्यास तो तत्काळ जप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फळ मार्केटमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयांनी मंगळवारी विशेष मोहीम राबवून दोन गोणी गुटखा जप्त केला आहे. ज्या पटºयांवर गुटखा आढळला त्याचा अहवाल तयार केला असून तो वरिष्ठांना देण्यात येणार आहे.एपीएमसीच्या सुरक्षा विभागाकडून वारंवार अशाप्रकारची कारवाई केली जाते, परंतु पोलीस स्टेशन व अन्न आणि औषध प्रशासनाकडून संबंधितांवर कडक कारवाई केली जात नाही. यामुळे सुरक्षारक्षकांच्या कारवाईवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. यापूर्वीही भाजी व फळ मार्केटमध्ये सुरक्षा विभागाने कारवाई करून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला आहे. याविषयी अहवाल बाजार समिती प्रशासनालाही देण्यात आला आहे. पण यानंतरही गुटखा विक्री करणाºयांवर गुन्हे दाखल करून तो माल अद्याप अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला नाही.>२०० किलो रोजची विक्री>बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये रोज सरासरी २०० किलो गुटखा विकला जातो. भाजी व फळ मार्केटमध्ये एकाच परिवारातील चार ते पाच व्यक्ती गुटखा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी अनेक पानटपºया भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. धान्य व मसाला मार्केटमध्ये एक व्यक्ती गुटखा पुरवठा करतो. या दोन मार्केटमध्ये आरएमडी गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून एका पुडीला ५० रुपये घेतले जात आहेत.
गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई, सुरक्षा विभागाची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:33 PM