धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीवर कारवाई '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:10 AM2018-05-12T02:10:57+5:302018-05-12T02:10:57+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील अनधिकृत झोपडपट्टीवर सिडको व महापालिकेच्या पथकाने कारवाई केली
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील अनधिकृत झोपडपट्टीवर सिडको व महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. १५० पेक्षा जास्त झोपड्या हटविण्यात आल्या आहे. याठिकाणी गांजा विक्री होत असल्यामुळे कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती.
एपीएमसीजवळील सेक्टर १९ ए मधील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या १५ भूखंडांवर १५० पेक्षा जास्त झोपड्यांचे बांधकाम झाले होते. याच ठिकाणी अनेक वर्षांपासून गांजा विक्रीचा अड्डा सुरू होता. अमली पदार्थ विरोधी पथक व एपीएमसी पोलिसांनी वारंवार कारवाई केल्यानंतरही अमली पदार्थांची विक्री थांबत नव्हती. एक तुरूंगात गेला की आरोपीचे इतर नातेवाईक त्या ठिकाणी व्यवसाय करत होते. अवैध व्यवसाय होत असल्यामुळे येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी होऊ लागली होती. यापूर्वीही सिडको व महापालिकेच्या पथकाने कारवाई केली होती. परंतु कारवाई झाली की पुन्हा अतिक्रमण होऊ लागले होते. शुक्रवारी सिडको व महापालिकेच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी कारवाई केली. १२ हजार चौरस मीटर भूखंड अतिक्रमणमुक्त केला आहे.
पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी येथील भूखंडाला कुंपण घालून त्यांची विक्री केली जाणार आहे. हे भूखंड सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी राखीव आहेत. शुक्रवारी झालेल्या कारवाईमध्ये सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे एस. एस. पाटील, पी. बी. राजपूत, सी. व्ही. तांबडे, महापालिकेच्या विभाग अधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्यासह ८० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.