लाचप्रकरणी पालिका उपायुक्तांच्या लिपिकावर कारवाई; बदलीसाठी पाच लाखाची मागणी
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 28, 2023 09:15 PM2023-04-28T21:15:52+5:302023-04-28T21:16:31+5:30
महापालिकेच्या कर्मचाऱ्याला नेरुळ विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. यासाठी परिमंडळ उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचे लिपिक दिनेश सोनावणे यांनी 5 लाखाची मागणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पालिका कर्मचाऱ्याकडे बदलीसाठी पाच लाखाची मागणी करणाऱ्या उपायुक्तांच्या लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. दिनेश सोनावणे (47) असे लिपिकाचे नाव असून त्याने वरिष्ठांची तक्रादाराकडे पाच लाखाची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त होताच नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने शुक्रवारी सापळा रचून कारवाई केली.
महापालिकेच्या कर्मचाऱ्याला नेरुळ विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. यासाठी परिमंडळ उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांचे लिपिक दिनेश सोनावणे यांनी 5 लाखाची मागणी केली होती. हि रक्कम वरिष्ठांची असल्याचे त्याचे म्हणणे होते. याबाबत पालिका कर्मचाऱ्याने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार उप अधीक्षक शिवराज म्हेत्रे यांच्या पथकाने शुक्रवारी संध्याकाळी कोपर खैरणे येथील महापालिकेच्या कार्यालयात सापळा रचला होता. त्यामध्ये सोनावणे याने लाचेची रक्कम स्वीकारताच कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी सोनावणे विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. दरम्यान सोनावणे याने कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी पैशाची मागणी केली ? त्या अधिकाऱ्यांपर्यंत कारवाईचा फास आवळेल का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.