ड्रायडेतही दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई, कोपर खैरणेतला प्रकार
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 3, 2022 06:54 PM2022-10-03T18:54:26+5:302022-10-03T18:54:48+5:30
कोपर खैरणे सेक्टर १८ येथील क्लासिक हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून हि कारवाई केली आहे
नवी मुंबई : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त रविवारी ड्रायडे असतानाही कोपर खैरणेतील हॉटेलमधून दारूविक्री सुरु होती. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. त्यामध्ये सुमारे पाच लाखाचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.
कोपर खैरणे सेक्टर १८ येथील क्लासिक हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून हि कारवाई केली आहे. त्याठिकाणी रविवारी रात्रीच्या सुमारास दारू विक्री सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. रविवारी महात्मा गांधी यांची जयंती निमित्ताने ड्रायडे असल्याने सर्व बार व वाईन शॉप बंद होते. यानंतरही सदर ठिकाणी ग्राहकांना दारू विक्री सुरु होती. याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी ग्राहकांना पार्सल दारू विक्री सुरु असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी अमोल अटोगले, रोहित शेट्टी, मुन्ना शेख व सद्दाम शेख यांच्यावर कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विक्रीसाठी ठेवलेला सुमारे पाच लाखाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.