अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी दगडफेक, कोपरखैरणे येथे अनधिकृत झोपड्या हटवताना घडला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:22 AM2018-06-06T01:22:29+5:302018-06-06T01:22:29+5:30
कोपरखैरणे येथे सिडकोची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून, त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षकाचाही समावेश आहे.
नवी मुंबई : कोपरखैरणे येथे सिडकोची अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले असून, त्यामध्ये वरिष्ठ निरीक्षकाचाही समावेश आहे. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून झोपडपट्टीवासीयांना ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
कोपरखैरणे येथे रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले होते. सदर भूखंड सिडकोच्या ताब्यात असून, त्यांनी यापूर्वी तीन ते चार वेळा त्या ठिकाणी कारवाई करूनही झोपड्या हटलेल्या नव्हत्या. अखेर या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता मंगळवारी सकाळी झोपड्यांवर सिडकोतर्फे कारवाई सुरू होती. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्तही पुरवलेला होता. मात्र, पूर्वतयारीत असलेल्या झोपडपट्टीतील महिला, मुलांनी सिडकोच्या पथकावर तसेच पोलिसांवर दगडफेक सुरू केली. काहींनी पोलिसांच्या दिशेने मिरची पावडर फेकली. मुलांनी बेचकीने दगड मारले. यामुळे पोलिसांनी रस्त्याकडे धाव घेतली असता, पाठलाग करून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये दगड लागून कोसळल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह एक पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस कर्मचारी असे सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी व पालिका रुग्णालयात दाखल करून संध्याकाळी सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, नितीन पवार, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, किरण पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. झोपडपट्टीधारकांनी कारवाई पथक व पोलिसांना पळवून लावण्यासाठी रस्त्यावरील वाहनांवरही दगडफेक केली. यात काही खासगी वाहनांसह कारवाईतील जेसीबी, पोलिसांच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. अखेर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शीघ्र कृती दलासह पोलिसांची जादा कुमक मागवली. त्यांनी १५ ते २० जणांना ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही काहींनी दोन झोपड्या पेटवल्या. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. यात काही भूमाफियांचा हात असण्याची शक्यता आहे. हल्ल्यामागील सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने बेलापूरच्या शहाबाज गाव सेक्टर-१९ मधील संजय कोळी यांचचे चार मजली अनधिकृत बांधकाम पाडले. याशिवाय कोपरखैरणे सेक्टर-४मधील बैठ्या चाळीतील तीन वाढीव मजल्याचे बांधकामही पाडले.
दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे
अतिक्रमण कारवाईदरम्यान सिडकोच्या पथकावर व पोलिसांवर दगडफेक करणाºयांविरोधात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. रात्रीपर्यंत १५पेक्षा जास्त दंगेखोरांना ताब्यात घेतले असून, सूत्रधाराचाही पोलीस शोध घेत आहेत.