मंदिरांवर कारवाई, पानटप-यांना अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 01:21 AM2018-01-19T01:21:38+5:302018-01-19T01:21:43+5:30
पनवेल व नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे
नामदेव मोरे
नवी मुंबई : पनवेल व नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. मंदिरांवरही कारवाई करणा-या प्रशासनाने हॉटेलबाहेरील पानटपºयांना अभय देण्यास सुरुवात केली आहे. पानटपरी चालकाकडून १० ते ४० हजाररुपये भाडे वसुली केली जात असून, चोरून वीजपुरवठा सुरू आहे. अतिक्रमणांना अभय देऊन प्रशासन सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास चालना देऊ लागले आहे.
पनवेलमध्ये बारबाहेरील पानटपरीवरून झालेला वाद विकोपाला गेल्याने दोन गटांत राडा झाला. हॉटेलमध्ये बॅट व इतर अवजारांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे हॉटेल बाहेरील अनधिकृत टपºयांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये छोटी - मोठी पाच हजारपेक्षा जास्त हॉटेल आहेत. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर अनधिकृतपणे पानटपरी सुरू करण्यात आली आहे. पानटपºयांमध्ये प्रचंड मोठे अर्थकारण दडले आहे. हॉटेल चालक सार्वजनिक वापराच्या जागेमध्ये अतिक्रमण करून टपरी उभारत असून, ती १० ते ४० हजार रुपये भाडे आकारून परप्रांतीयांना चालविण्यासाठी देत आहेत. हॉटेलसाठी अनधिकृतपणे वीजपुरवठा दिला जात आहे. पानटपरीमध्ये विडी, सिगारेटपासून बंदी असलेला गुटखाही बिनधास्तपणे विकला जात आहे. बारबाहेरील ८० टक्के टपºयांमध्ये गुटखा विक्रीसाठी ठेवला जात आहे. पानटपरीबाहेर पहाटेपासून रात्री १२ वाजेपर्यंत धूम्रपान सुरू असते. बिनधास्तपणे सुरू असलेल्या धूम्रपानाचा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे.
महापालिका प्रशासनाने शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहिमा सुरू केल्या आहेत. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई केली जात आहे. माथाडी व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी केलेल्या बांधकामांवरही कारवाई केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी धार्मिक स्थळांवरही कारवाई सुरू आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; परंतु नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाºया हॉटेलबाहेरील पानटपºयांवर मात्र कधीच कारवाई करण्यात येत नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने वर्षभरात एकाही पानटपरीवर कारवाई केलेली नाही. पानटपºयांना अभय देण्यामध्ये मोठे अर्थकारण दडल्याने जाणीवपूर्वक पानटपºयांवर कारवाई केली जात नाही. यामुळे दक्ष नागरिकांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या घरांवर हातोडा चालविणाºया प्रशासनाने अनधिकृत टपºया सर्वप्रथम हटवाव्या व त्यांना अभय देणाºया हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
वीजचोरीकडे दुर्लक्ष : गणेशोत्सव व नवरात्री उत्सव मंडळांना दहा दिवसांसाठी स्वतंत्र वीजमीटर घेण्याची सक्ती केली जाते. अधिकृत वीजमीटर न घेणाºया मंडळांवर गुन्हे दाखल केले जातात; परंतु शहरातील सर्व अनधिकृत टपºयांना हॉटेलमधून चोरून वीज दिली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वीजमीटरची सक्ती करणारे महावितरण प्रशासनही पानटपºयांसाठीच्या वीजचोरीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांचे
आरोग्य धोक्यात
पानटपºयांच्या बाहेर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत धूम्रपान सुरू असते. या परिसरातून ये - जा करणाºया नागरिकांना सिगारेटच्या उग्र वासामुळे श्वास घेण्यासही त्रास होत आहे. बिनधास्तपणे सुरू असलेल्या धूम्रपानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होवू लागला असून महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.