नवी मुंबई : महापालिका क्षेत्रामध्ये दुकानांसमोरील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचे व फेरीवाल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विशेष मोहीम राबविण्यात आली. तब्बल १२७ फेरीवाले व मार्जिनल स्पेसचा वापर करणाºया २२८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सुनियोजित नवी मुंबईचे रूप आपल्या नावलौकिकाला साजेसे असावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्र मणे, मार्जिनल स्पेसचा गैरवापर, पदपथ व रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले यांचे प्रमाण वाढत आहे. स्थायी समितीमध्येही फेरीवाले व मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यामुळे अतिक्रमण करणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी दिले आहेत. बेलापूर ते दिघा अशा सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसवर धडक कारवाई हाती घेण्यात आली असून फेरीवाले व मार्जिनल स्पेसचा वापर करणाºया एकूण ३५५ जणांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण करणाºयांकडून ८ लाख ८ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील पदपथ व रस्ते नागरिकांना चालण्यासाठी व वाहतुकीसाठी खुले असावेत ही महानगरपालिकेची भूमिका असून त्यादृष्टीने त्याठिकाणी वाहतुकीस व रहदारीस अडथळा आणणाºया अनधिकृत फेरीवाल्यांवर व मार्जिनल स्पेसमध्ये व्यवसाय करणाºया व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.