लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : येथील बेलापूर टेकडीवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडको, नवी मुंबई महापालिका आणि महावितरणने अखेर कारवाई सुरू केली आहे. यानुसार या बांधकामाचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे.सिडकोने येथील आतापर्यंत दोन बांधकामे तोडली असून, पुढील कारवाई पावसामुळे थांबविली असल्याची माहिती याचिकाकर्ते नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी दिली. उर्वरित बांधकामे तोडण्याची कार्यवाही पाऊस ओसरल्यावर करण्यात येणार आहे. बेलापूर टेकडीवरील तब्बल २.३० लाख चौरस फूट क्षेत्रावर बेकायदेशीरपणे व्यापलेल्या या धार्मिक वास्तू पाडण्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमींकडून लढा सुरू आहे. याबाबतची आंदोलने आणि वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे राज्य मानवी हक्क आयोगाने स्वत:हून सुमोटो याचिका दाखल केली आहे.
बांधकामाविरोधाला लढा २०१५ पासूनचानवी मुंबईतील नॅटकनेक्ट फाउंडेशनने पर्यावरणाच्या उल्लंघनाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांच्या म्हणण्यानुसार टेकडीवर धार्मिक वास्तूंनी तब्बल २.३० लाख चौरस फूट जागा व्यापली आहे. अनधिकृत बांधकामांविरोधातील हा लढा २०१५ पासून सुरू आहे. त्यावेळी स्थानिक कल्पतरू सहकारी गृहनिर्माण संस्थेसह तेथील रहिवासी हिमांधू काटकर यांनी तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. परंतु, सिडकोने काहीच हालचाल न केल्याने पर्यावरणप्रेमींनी याविरोधात लढा सुरू केला. त्याची दखल घेऊन मानवी हक्क आयोगाने मुख्य सचिव, नगरविकास आणि पर्यावरण विभागांचे प्रधान सचिव, सिडकोचे एमडी, महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.
दोन संस्थांना हस्तक्षेप याचिकेस परवानगीबेलापूर टेकडीवरील दोन धार्मिक संस्थांनी मानवी हक्क आयोगाकडे हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. कारण त्यांच्या नियमितीकरणाच्या याचिका सिडकोकडे प्रलंबित आहेत. त्यानुसार आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती के. के. तातेड आणि सदस्य एम. ए. सईद यांच्या पीठापुढे पुढील सुनावणी २६ ऑगस्ट राेजी आहे.विश्वनाथ महाराज ट्रस्टचे बांधकाम सिडको स्थापनेपूर्वीचेटेकडीवरल संत सदगुरू विश्वनाथ महाराज समाधी ट्रस्टने आमच्या संस्थेचे बांधकाम सिडकोच्या स्थापनेपूर्वीचे असून, १९६५ ते ७० दरम्यान धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. तेव्हापासून संस्थेचे धार्मिक आणि समाजकार्य सुरू केले असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळेच ट्रस्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे नवी मुंबई महापालिकेने संत सदगुरू विश्वनाथ महाराज समाधी मार्ग असे नामकरण केले आहे. तसेच आम्ही महापालिकेचा मालमत्ताकर सुद्धा भरत असल्याचे सांगितले.मागितला तेव्हा बंदोबस्त दिलाबेलापूर टेकडीवरील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्त मिळत नाही, हा सिडकोचा दावा पूर्णपणे असत्य आहे. सिडकोने जेव्हा जेव्हा बंदोबस्त मागितला तेव्हा तेव्हा त्यांना दिला आहे. उलट ही बांधकामे तोडण्यासाठी एसीपींच्या नेतृत्वात २०० वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देऊनसुद्धा मागे एकदा सिडकोचे पथक उशिरापर्यंत आले नाही, अशी माहिती बेलापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरिधर गोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.