सिडकोच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 07:30 PM2019-06-10T19:30:17+5:302019-06-10T19:31:57+5:30
प्रितमसिंग भरतसिंग राजपूत व विकास किसन खडसे अशी कारवाई झालेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
नवी मुंबई : अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी दहा लाखाची मागणी करणारया सिडकोच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात सिबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेच्या दहा लाखापैकी अडिच लाख रुपये खासगी व्यक्तीमार्फत स्विकारताना सापळा रचून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने हि कारवाई केली.
प्रितमसिंग भरतसिंग राजपूत व विकास किसन खडसे अशी कारवाई झालेल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. दोघेही अनधिकृत बांधकाम विभागात कार्यरत असून राजपुतकडे विकास अधिकारी तर खडसेकडे भुमापक नियंत्रक पदाचा कार्यभार आहे. त्यांच्याविरोधात रबाडा येथील व्यक्तीने नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी राहत्या घराच्या पुर्नबांधणीचे काम सुरु केले होते. मात्र सदर काम विनापरवाना होत असल्याने त्यावर सिडको मार्फत कारवाईचा इशारा खडसे यांनी दिला होता. तर कारवाई टाळायची असल्यास दहा लाख रुपयांची मागणी केली होती.
तडजोडी अंती त्यांनी 8 लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. त्यापैकी अडिच लाख रुपये सोमवारी मागीतले होते. सिबीडी येथील रायगड भवण इमारतीच्या कॅन्टीन मध्ये हि रक्कम स्विकारली जाणार होती. त्यानुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधिक्षक रमेश चव्हाण यांच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला होता. यावेळी कॅन्टीनचा कर्मचारी प्रदिप पाटील याच्या मार्फत हि रक्कम स्विकारली जाताच कारवाई करण्यात आली. चौकशीत खडसे व राजपुत यांची नावे समोर येताच त्यांच्यावरही कारवाई करुन सिबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या कारवायांमध्ये मोठय़ा प्रमाणात अपारदर्शकता व अर्थकारण असल्याचे आरोप यापुर्वी देखिल शहरातील नागरीकांकडून होत होते. मात्र तक्रारी अभावी त्यांना वाचा फुटत नव्हती. अखेर रबाळे येथील प्रकरणावरुन कारवाईचा धाक दाखवून पैसे उकळले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये इतरही प्रकरणे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.