नवी मुंबई : कोरोना रुग्णांवर विनापरवाना उपचार करणाऱ्या आणखी दोन रुग्णालयांवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. संबंधितांना प्रत्येकी एक लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये पालिकेची परवानगी नसताना, काही रुग्णालयांमध्ये बेकायदेशीरपणे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गत आठवड्यामध्ये वाशीतील पामबीच हॉस्पिटलवर कारवाई झाली होती. त्यांचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे.
ऐरोलीमधील क्रिटीकेअर आयसीयू आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व वाशीतील ग्लोबल ५ हेल्थ केअर या दोन्ही रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची तक्रार पालिकेकडे आली होती. संबंधित रुग्णालयांना मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती, परंतु संबंधितांनी काहीही उत्तर दिले नाही. परिणामी, मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन्ही रुग्णालयांवर प्रत्येकी एक लाख दंड आकारला आहे. रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करून घेऊ नये, असा इशाराही दिला आहे. काही रुग्णालयांमध्ये बेकायदेशीरपणे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात असून, असे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई सुरूच राहील, असेही मनपा प्रशासनाने स्पष्टकेले आहे.