नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंगळवारी कोपरखैरणेत एक बेकायदा इमारत जमीनदोस्त केल्यानंतर आज घणसोलीतील एका तीन मजली इमारतीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. यात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली परिसरात आजही मोठ्याप्रमाणात बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. सध्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. घणसोलीजवळील तळवली येथे एका तीन मजली इमारतीचे काम सुरू होते. हे काम थांबविण्यासंदर्भात संबंधित बांधकामधारकाला नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यानंतरही काम सुरूच ठेवल्याने बुधवारी अखेर त्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी.बी. राजपूत यांनी दिली. महापालिकेच्या संयुक्त सहकार्याने झालेल्या या कारवाईदरम्यान, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यात कोणीलाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
घणसोलीत अनधिकृत इमारतीवर कारवाई
By admin | Published: January 26, 2017 3:35 AM