नवी मुंबई : सिडकोने अनधिकृत बांधकामांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. जानेवारी २०१३ नंतरच्या बांधकामांना अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून २१९ बांधकामांना नोटीस दिली आहे. लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे. नवी मुंबईमधील मूळ गावठाणांमध्ये गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी पाठपुरावा सुरू केला आहे. जानेवारी २०१३ पर्यंतची घरे नियमित करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यानंतरच्या बांधकामांवर कारवाई करण्यास सिडकोने सुरुवात केली आहे. जूनमध्ये सुरू केलेल्या कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध केला होता. ग्रामस्थांनी सिडकोवर भव्य मोर्चा काढून कारवाई थांबविण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवस थांबलेली कारवाई आता पुन्हा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने नवी मुंबई व पनवेल परिसरातील २१९ बांधकामांची यादी तयार केली आहे. विभागनिहाय यादीच वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. १० दिवसांची अंतिम नोटीस दिली असून त्यानंतर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)
अनधिकृत इमारतींवर लवकरच कारवाई
By admin | Published: August 07, 2015 11:28 PM