सिडकोची अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:54 AM2018-05-23T02:54:10+5:302018-05-23T02:54:10+5:30
कळंबोलीत झोपड्या हटविल्या : नेरुळमध्ये इमारत जमीनदोस्त
पनवेल : सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नेरुळ व कळंबोली परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. कळंबोली गावात ४०पेक्षा जास्त झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. नेरुळमध्ये अनधिकृत इमारत पाडण्यात आली.
आदिवासी समाजामार्फत या ठिकाणी गरजेपोटी घरे व झोपड्या बांधलेल्या होत्या. मात्र, संबंधित जागा ही साडेबारा टक्के आरक्षित भूखंडासाठी असल्याने सिडकोने ही कारवाई केली. आदिवासी व स्थानिक ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरावर सिडकोची कारवाई ही काही बिल्डरांच्या फायद्याकरिता केली जात असल्याचा आरोप या वेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आला. या कारवाई वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.
नेरुळ येथील साडेबारा टक्केच्या राखीव भूखंडावरील अनधिकृत बांधकामावर मंगळवारी सिडकोच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने तिथली पक्की बांधकामे पाडून भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. त्यानुसार मंगळवारी सकाळी नेरुळ सेक्टर ६ येथील साडेबारा टक्केअंतर्गत वाटपासाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात आले. सिडकोने सूचना केल्यानंतरही संबंधितांकडून अतिक्रमण हटवले जात नव्हते. अखेर मंगळवारी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्याठिकाणी कारवाई केली.