ऐरोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:05 AM2018-08-30T05:05:02+5:302018-08-30T05:05:34+5:30
सिडकोची धडक मोहीम : ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड केला अतिक्रमणमुक्त
नवी मुंबई : अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर सिडकोने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. बुधवारी ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून सुमारे ४०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला. विशेष म्हणजे, या कारवाईला बांधकामधारकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी हा विरोध हाणून पाडल्याने सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही मोहीम पूर्ण केली.
शहरात आजही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडून अधूनमधून कारवाई केली जाते; परंतु ही मोहीम म्हणावी तशी प्रभावी नसल्याने बांधकामधारक मोकाट सुटले आहेत, त्या तुलनेत सिडकोने मात्र आपल्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका लावला आहे. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस. एस. पाटील यांच्या निर्देशानुसार नवी मुंबईसह पनवेल व उरण तालुक्यातील सिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबविली जात आहे.
बुधवारी अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी. बी. राजपूत आणि सहायक नियंत्रक गणेश झिने यांच्या उपस्थितीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात ऐरोली सेक्टर ९ मधील एक मजल्याच्या अनधिकृत इमारतीवर हातोडा मारण्यात आला. विशेष म्हणजे, या बांधकामाला एमआरटीपी अॅक्टनुसार नोटीसही बजावण्यात आली होती; परंतु संबंधिताने काम सुरूच ठेवल्याने अखेर त्यावर कारवाई करण्यात आली. सेक्टर ९ येथील दिवा-ऐरोली विभागात २५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उभारण्यात आलेले जोथ्यापर्यंतचे पक्के बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईच्या वेळी १०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर २० मजूर, दोन पॉकलेन आणि एक जेसीबी आदी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. दरम्यान, येत्या काळात अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याने नागरिकांनी बेकायदा बांधकामे करू नयेत, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.