नवी मुंबई : सातत्याने कारवाया करूनही वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची शिस्त लागत नसल्याने वाशी पोलिसांनी बुधवारी विशेष मोहीम राबवली. याअंतर्गत वाशी-कोपरखैरणे मार्गावरील ब्ल्यू डायमंड चौकात मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या. या वेळी पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी अनेकांकडून विरुद्ध दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न होऊ लागल्याने त्या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
रस्ते अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहनचालकांवर मोठ्या संख्येने कारवाया केल्या जात आहेत. या दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या शिफारशीवरून बेशिस्त चालकांचा वाहनचालक परवाना तीन अथवा सहा महिन्यांसाठी निलंबितही केला जात आहे. त्यामुळे अनेकांनी या कारवायांचा धसका घेतला आहे. मात्र, तरुणांमध्ये अद्यापही वाहतुकीच्या नियमांबाबत जागरूकता झाल्याचे दिसून येत नाही. महाविद्यालयीन तरुणांकडून विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे वाशी वाहतूक पोलिसांनी अचानक धडक मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली. वाशी कोपरखैरणे मार्गावर ब्ल्यू डायमंड चौकात बुधवारी दिवसभर ही मोहीम राबवण्यात आली. या दरम्यान हेल्मेट न वापरणारे, चालक परवाना नसणारे, सिट बेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना फोनचा वापर अशा अनेक हेडखाली कारवाया करण्यात आल्या. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, उपनिरीक्षक रोहण बागडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी एकाच वेळी दोन्ही दिशेच्या मार्गावर कारवाईची मोहीम सुरू केल्याने बेशिस्त चालकांकडून कारवाईतून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तर दुचाकीस्वारांनी पुढे कारवाई सुरू असल्याचे समजताच अर्ध्या रस्त्यातून विरुद्ध दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्यासह इतरांच्या अपघाताची शक्यता असतानाही त्यांच्याकडून आटापिटा सुरू होता. या प्रकारामुळे ब्ल्यू डायमंड चौकालगत दोन्ही दिशेच्या मार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती.वाशी वाहतूक पोलिसांनी ब्ल्यू डायमंड चौकात केलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गतच्या कारवाईत ६७५ चालकांवर कारवाई करण्यात आली. सिग्नल तोडणे, सिट बेल्ट न वापरणे, मोबाइलचा वापर तसेच हेल्मेटचा न वापर, अशा हेडखाली कारवाई करण्यात आली. त्याकरिता वाहतूक पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी अशा ३५ जणांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.