कळंबोली : कळंबोली वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट वाहने चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. प्रभारी अधिकारी अंकुश खेडकर यांनी सोमवारी मोहीम हाती घेतली होती. हेल्मेट न घालणाºया वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
कळंबोली परिसरातून पनवेल-सायन, त्याचबरोबर एनएच-४ आणि ४ बी हे महामार्ग जातात. त्यामुळे या भागाला जंक्शनचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. दुचाकीस्वार महामार्गावर विनाहेल्मेट वाहने चालवतात. वास्तविक पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. त्यानुसार कायद्याने सक्ती करण्यात आलेली आहे. तरीही तरुण विना हेल्मेट महामार्गावर सुसाट जातात. त्यामुळे कळंबोली वाहतूक शाखेने हेल्मेट न घालणाºया चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. आज अंकुश खेडकर यांनी शिवसेना शाखा येथे अशा वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला त्याचबरोबर त्यांना हेल्मेट घालण्याचे आवाहन सुध्दा करण्यात आले. त्याचबरोबर फायरब्रिगेडच्या चौकातही स्वतंत्र पथक पाठवून मोहीम राबविण्यात आली.काही दिवसांपूर्वी विना हेल्मेट वाहनचालकांना शंभर हेल्मेट देवून त्यांचे प्रबोधन करण्यात आले होते. अशा प्रकारे मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले.