शहरातील ४६२ धार्मिक स्थळांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:20 AM2017-08-11T06:20:13+5:302017-08-11T06:20:13+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मनपा क्षेत्रामधील ४६२ धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून यामधील तब्बल ३३५ सिडकोच्या जागेवर बांधण्यात आली आहेत.
नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. मनपा क्षेत्रामधील ४६२ धार्मिक स्थळांवर कारवाई होणार असून यामधील तब्बल ३३५ सिडकोच्या जागेवर बांधण्यात आली आहेत.
अनधिकृत धार्मिक स्थळांवर १७ नोव्हेंबर २०१७ पर्यंत कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याविषयी कार्यवाही करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची आढावा बैठक गुरूवारी मनपा मुख्यालयामध्ये आयोजित केली होती. आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी, वन, कांदळवन, रेल्वे प्रशासनाचे व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१६ मध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. महापालिकेच्या जागेवर सद्यस्थितीमध्ये १७, सिडकोच्या जागेवर ३३५, एमआयडीसीच्या जागेवर १००, वन विभागाच्या जागेवर ७, कांदळवन विभागाच्या जागेवर १, रेल्वे प्राधिकरणाच्या जागेवर २ धार्मिक स्थळे आहेत. या बैठकीमध्ये याविषयी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या विहित मुदतीत कार्यवाही करण्याचे समिती अध्यक्ष तथा महापालिका आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
शासकीय कार्यालयातील धार्मिक स्थळेही संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्वत:हून काढावीत, असेही यावेळी सूचित करण्यात आले. शासन निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत मुदतीत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या बैठकीत दिले आहेत.