नवी मुंबई : तुर्भे जंक्शन येथे ठाणे-बेलापूर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांप्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्या ठिकाणच्या सुमारे ३०० मीटरच्या रस्त्याची चाळण झाल्याने संपूर्ण सायन-पनवेल मार्गावरील वाहतुकीवर ताण पडत आहे, तसेच सायन-पनवेल मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दोघांचे बळी गेल्या प्रकरणीही दोषींवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.तुर्भे जंक्शन येथे सुमारे ३०० मीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तुर्भेकडून नेरुळकडे जाणाऱ्या या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याच ठिकाणी सायन-पनवेल मार्गाचा भागही जोडला गेलेला आहे, यामुळे सदर ठिकाणच्या खड्ड्यांमुळे सानपाडाकडून जुईनगरकडे जाणाºया वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. खड्ड्यांमधून मार्ग काढत अत्यंत धिम्या गतीने वाहने चालवावी लागत असल्याने ही वाहतूककोंडी होत आहे. अशातच सदर मार्गावर मागील दहा दिवसांत खड्ड्यांमुळे अपघात होऊन दोघांचे प्राण जाऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यावरून मनसेने काही दिवसांपूर्वी तिथल्या खड्ड्यांना मंत्र्यांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली होती. अशातच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पी.डब्ल्यू.डी.च्या अधिकाºयांसह तुर्भे जंक्शन येथील रस्त्याचीही पाहणी केली.सहा महिन्यांपूर्वीच सदर रस्त्याचे डांबरीकरण केलेले आहे. त्यानंतर पहिल्या पावसातच रस्त्याची चाळण झाल्याने कामाचा निकृष्टपणा उघड झालेला आहे, त्यामुळे सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून कारवाईचे आश्वासन दिले. तसेच खड्ड्यांमुळे अपघात होऊन दोघांचे निधन झाल्याची खंत व्यक्त करून दोषींवर कारवाईचेही ते म्हणाले. तर तुर्भे जंक्शन येथील खड्ड्यांची समस्या कायमची सोडवण्यासाठी तिथला सुमारे ३०० मीटरचा रस्ताही काँक्रीटचा करण्याचा प्रस्ताव असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. यामुळे आगामी काळात वाहतूककोंडी व अपघातांच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, पी.डब्ल्यू.डी.चे अधिकारी किशोर पाटील, वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किसन गायकवाड, माजी नगरसेवक जितेंद्र कांबळी, प्रकाश पाटील, महेश कोठीवाले उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 2:09 AM