नवी मुंबई : उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई महापालिकेने दिले आहेत. नवी मुंबई महापालिका गेल्या काही वर्षांपासून कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे. त्याअनुषंगाने शहरातील कचराकुंड्यांची संख्या हळूहळू कमी केली जात आहे. नेरूळ आणि बेलापूर विभागात कचराकुंडी हटविलेल्या ठिकाणी बॅनर लावून उघड्यावर कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु संबंधित नियमांचे उल्लंघन केले जात असून कचराकुंडी हटविलेल्या ठिकाणी, पदपथ आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. महापालिकेने या वृत्ताची दखल घेतली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे तसेच उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
शहरात स्वच्छता राखणे जेवढी महापालिकेची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी शहरातील प्रत्येक नागरिकाचीही आहे. शहराचे सौंदर्य आणि आपले आरोग्य यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून उघड्यावर कचरा टाकणे योग्य नाही. कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असून कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. - राजेंद्र सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी, न.मुं.म.पा.
गस्त घालण्याचा निर्णयज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो अशा ठिकाणी गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी कचरा टाकताना नागरिक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत.