मुंबई : रिक्षा भाडे नाकारणे, गणवेश नसणे, बॅच आणि परमिट नसणे अशा तक्रारी दाखल झालेल्या रिक्षा-टॅक्सींवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या मुजोर रिक्षा-टॅक्सी चालकांवर संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयासह परिवहन आयुक्तालयातर्फेदेखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली.शहरात सुमारे दीड लाखापेक्षा जास्त रिक्षा धावत असून यापैकी सुमारे ३० हजार रिक्षा अनधिकृत असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. यानुसार शहरात धावणारी सहावी रिक्षा ही अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते. रिक्षा चालविताना योग्य गणवेश न घालणे, बॅच नसणे, वाहन परवाना नसल्याच्या तक्रारी समाजमाध्यमांद्वारे प्रवाशांकडून करण्यात येतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या टोल फ्री १८००-२२-०११० क्रमांकावरही प्रवाशांचा फोन सतत खणखणत असतो. त्याचबरोबर पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष ई-मेल तयार करण्यात आले असून ई-मेलमार्फतही प्रवाशांच्या शेकडो तक्रारी येत असल्याची माहिती परिवहन आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
प्रवाशांच्या तक्रारीनुसार अनधिकृत रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित आरटीओला देण्यात आल्या आहेत. परिवहन आयुक्तालयातून उपलब्ध मनुष्यबळानुसार विशेष पथकाची नियुक्ती करून लवकरच कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले. सध्या समोर येत असलेल्या अनधिकृत रिक्षांच्या आकडेवारीमध्ये तथ्य नाही. मुंबईत काही प्रमाणात अनधिकृत रिक्षा आहेत. मात्र त्यांची संख्या जास्त नाही. अनधिकृत रिक्षा असल्यास त्या रिक्षाचा क्रमांक परिवहन आयुक्तालयाला लेखी द्यावा. जेणेकरून आयुक्तालयाकडून त्या रिक्षावर कारवाई करण्यात येईल. आरटीओ आणि दलालांच्या माध्यमाने अपूर्ण कागदपत्रे असतानादेखील पैशांसाठी बॅच आणि परमिट देण्यात आले आहेत. यामुळे कारवाई करताना दोषी अधिकाºयांपासून सुरुवात करणे गरजेचे असल्याचे स्वाभिमान संघटनेचे के.के. तिवारी यांनी स्पष्ट केले.आरटीओ आणि दलालांच्या माध्यमाने अपूर्ण कागदपत्रे असतानादेखील पैशांसाठी बॅच आणि परमिट देण्यात आले आहेत. यामुळे कारवाई करताना दोषी अधिकाºयांपासून सुरुवात करणे गरजेचे आहे.