नवी मुंबई - सोसायटीमधील अडथळा ठरणाºया वृक्षाच्या फांद्या तोडून तो कचरा रोडवर व पदपथावर टाकला जात आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, कचरा उचलताना पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापुढे वृक्ष छाटणीनंतर कचरा रोडवर टाकल्यास संबंधित सोसायटीवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.शहरातील हाउसिंग सोसायटी यांच्या आवारात असलेल्या वृक्षांच्या अनावश्यक वाढलेल्या धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याची परवानगी विभाग कार्यालय स्तरावरून देण्यात येते. सोसायटीचे पदाधिकारी फांद्यांची छाटणी करून फांद्या अर्थात हरित कचरा (ग्रीन वेस्ट) तेथील पदपथावर, सोसायटीच्या बाहेर टाकत आहेत. यामुळे पदपथावरून चालण्यास नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. या विषयी नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९च्या प्रकरण १४ मधील कलम १ (१) (२) अन्वये झाडांची छाटणी करून सोसायटीच्या बाहेर टाकल्यास संबंधित संस्था व सोसायटीच्या पदाधिकाºयांवर २५० रुपये दंड आकारला जाऊ शकतो.नागरिकांनी संस्था व सोसायटी यांच्या आवारात असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी करून, कचरा सोसायटीच्या आवारातच ठेवावा. दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या सोसायट्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:29 AM