आॅनलाइन शॉपिंगच्या बहाण्याने फसवणूक करणारी टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:58 AM2018-04-05T06:58:02+5:302018-04-05T06:58:02+5:30
क्लब फॅक्टरी व इतर कंपनीच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्या देशभर सक्रिय झाल्या आहेत. नवी मुंबईमध्येही अनेकांना गंडा घातला जात आहे. लाखो रुपयांची फसवणूक केली जात असून, नागरिकांनी आॅनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनीही केले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - क्लब फॅक्टरी व इतर कंपनीच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळ्या देशभर सक्रिय झाल्या आहेत. नवी मुंबईमध्येही अनेकांना गंडा घातला जात आहे. लाखो रुपयांची फसवणूक केली जात असून, नागरिकांनी आॅनलाइन खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनीही केले आहे.
कोपरखैरणेमध्ये राहणाºया किरण जांभळे या तरुणाने १ मार्चला क्लब फॅक्टरीच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन शर्टची आॅर्डर दिली होती. त्यासाठी डेबिट कार्डच्या माध्यमातून १०४८ रुपये पेमेंट जमा केले होते. दोन दिवसांमध्ये कंपनीने कपड्यांची डिलिव्हरी दिली नाही. यामुळे त्याने कंपनीच्या कस्टमर केअर नंबर (७७३९५३७०३०)वर संपर्क साधला. तेथील तरुणाने आर्डर क्रमांक मागितला व तुमची आॅर्डर तांत्रिक कारणाने रद्द झाली आहे. तुम्हाला तुमचे पैसे परत देण्यासाठी बँक खात्याचा सविस्तर तपशील व डेबिट कार्डचा ओटीपी नंबर मागितला. विश्वास ठेवून सर्व सविस्तर माहिती दिली व थोड्या वेळामध्ये दोन बँक खात्यांमधून १४५०० रुपये गायब करण्यात आले. कपडे खरेदी करण्यासाठी यापूर्वीच १०४८ रुपये भरले होते. १५,५४८ रुपये गायब झाल्यामुळे किरण व त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तत्काळ कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली; परंतु पोलिसांनीही फक्त लेखी अर्ज घेतला असून, प्रत्यक्ष गुन्हाही दाखल करून घेतलेला नाही. यामुळे पैसे परत मिळणार की नाही? याविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे.
आॅनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आॅनलाइन शॉपिंगच्या व्यवहारामधील त्रुटींचा लाभ उठवून फसवणूक करणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. बोगस कंपन्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. क्लब फॅक्टरीच्या नावाने कोपरखैरणेमधील युवकाची फसवणूक झाली. कंपनीच्या नावाने ग्राहक तक्रार निवारणासाठी संपर्क क्रमांक दिला आहे. वास्तविक या संपर्क क्रमांकावर बसलेल्या व्यक्तीला कोणीही फोन करून आम्ही कपडे विकत घेण्यासाठी आॅर्डर दिली आहे व डेबिट कार्डद्वारे पैसे दिले असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्ती डेबिट कार्डचा नंबर, ओटीपी नंबर मागून घेते व थोड्या वेळात बँक खात्यातील सर्व पैसे हडप केले जात आहेत, हे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे भविष्यात आॅनलाइन खरेदी करताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या कंपनीकडून खरेदी करायची त्यांची पत तपासून पाहावी.
गुगलवर जाऊन संंबंधित कंपनीची योग्य माहिती घ्यावी. पैसे देताना शक्यतो डेबिट कार्डचा वापर करू नये. कॅशआॅन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.
आॅनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी
च्आॅनलाइन शॉपिंग साइट्सचा चांगला अनुभव आहे, अशा कंपन्यांनाच प्राधान्य द्यावे.
च्वेबसाइट्सचे नाव तपासून घेणे. नामांकित कंपन्यांच्या बनावट वेबसाइट्स तयार करूनही फसवणूक केली जाते. यामुळे गुगलवर संबंधित कंपनीचे संकेतस्थळ सर्च करताना पुढे एचटीटीपीएस असल्याची खात्री करून घेणे.
च्पैसे देण्यासाठी बँक खात्याच्या तपशिलाचा वापर होतो. वेबसाइट्सच्या हिस्ट्रीमध्ये हे तपशील सेव्ह होतात. त्यामुळे ते इतरांच्या नजरेस पडू शकतात. अशा वेळी प्रायव्हेट मोडचा वापर करावा.
च्संकेतस्थळाऐवजी मोबाइल अॅपचा वापर करावा.
च्कॅशआॅन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा.
च्कोणत्याही स्थितीमध्ये डेबिट कार्डचा ओटीपी नंबर देऊ नये.
क्लब फॅक्टरी या कंपनीकडून आॅनलाइन शर्ट मागविला होता. डेबिट कार्डद्वारे पैसे जमा केले होते; पण कपड्यांची डिलिव्हरी न आल्याने, पुन्हा फोन केल्यानंतर संबंधितांनी बँक डिटेल मागितली. विश्वासाने माहिती दिली व थोड्या वेळाने बँकेतील १४,५०० रुपये गेले.
- किरण जांभळे, रहिवासी, कोपरखैरणे
आॅनलाइन शॉपिंग करताना संबंधित कंपनीची विश्वासार्हता तपासून पाहावी. शक्यतो डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे देण्याऐवजी कॅशआॅन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. कोणालाही डेबिट कार्डचा ओटीपी नंबर देऊ नये.
- तुषार दोशी, उपआयुक्त गुन्हे शाखा