नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत टॅबलॅबसह ॲक्टीव्हिटी झोन, शिक्षणासाठी अधुनीक साधनांचा वापर
By नामदेव मोरे | Published: March 2, 2023 05:23 PM2023-03-02T17:23:47+5:302023-03-02T17:23:55+5:30
महानगरपालिकेच्या रबाळे येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे डिजीटल लर्नींग स्कूलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
नवी मुंबई :
महानगरपालिकेच्या रबाळे येथील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे डिजीटल लर्नींग स्कूलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. सीएसआर निधीमधून शाळेत ४० टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ॲक्टिव्हिटी झोनही तयार केलाअ सून अत्याधुनीक साधनांचा वापर करून मुलांना शिक्षण देण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा कायापालट करण्यासाठी अधुनिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. रबाळेमधील राजर्षी शाहू विद्यालय ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. शिक्षण, क्रीडा व कला क्षेत्रात येथील विद्यार्थी नावलौकीक मिळवत आहेत. झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांना अधुनीक शिक्षण मिळावे यासाठी टॅबलॅब तयार करण्यात आली आहे. यासाठी हायवा कंपनीच्या सीएसआर निधीमधून ४० टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डिजीटल लर्नींग टूल्स आणि कन्व्हेजिनियर्स पीएएल सॉफ्टवेअरद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने नवीन संकल्पना सोप्या पद्धतीने शिकविल्या जाणार आहेत. शाळेत ॲक्टिव्हिटी झोनही तयार केला आहे. यामध्ये सापशिडी, बुद्धीबळ, रॉक क्लायबिंग, ॲबॅकस, अशा विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आलेली आहेत. सुर्यमालेची आकर्षक प्रतिकृतीही ग्रहांच्या वैशीष्ट्यांसह साकारण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते टॅबलॅबचे उद्घाटन करण्यात आले. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम सुरू केला आहे. यावेळी शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, हायवा कंपनीचे पंकज कपूर, प्रशांत मानकामे, सुदेश धाबेकर, मदन वाघचौरे, रेश्मा साठे, आनंदा गोसावी, अमोल खरसांबळे, जे. पी. सिंह, रंजना वनशा, कमलेश इंगळे,प्रशांत पिंपळे, देवेंद्र पाटील उपस्थित होते. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी यावेळी टॅब लॅब उपलब्ध करून देणाऱ्या व्यवस्थापनाचे आभार मानले. विद्यार्थ्यांना अधुनिक शिक्षण देता येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.