मुंबई : अभिनेत्री लीना पॉल आणि तिच्या साथीदारांविरोधात महाराष्ट्र गुंतवणूकदार सुरक्षा कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा नोंदविण्याचा विचार आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. जर या कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला तर लीनासह सर्व आरोपींची मालमत्ता जप्त होऊ शकेल.तीन महिन्यांत तिप्पट परतावा असे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने लीनासह तिचा भागीदार सेकर चंद्रशेखर, आदील हुसेन अख्तर जयपुरी, अख्तर हुसेन जयपुरी, नासीर मुमताज जयपुरी आणि सलमान फिरोज रिझवी यांना अटक केली आहे. हे आरोपी ४ मेपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. यापैकी अख्तर व नासीर ही ख्यातनाम गीतकार हसरत जयपुरी यांची मुले असून आदील हा नातू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली. लीना व सेकर यांनी अन्य आरोपींच्या मदतीने गुंतवणूकदार गोळा केले. मुलांचे शिक्षण, स्वत:चे घर यासाठी या योजना किती उपयोगी आहेत, हे त्यांच्या मनावर बिंबवले. या योजनेत काहींनी पाच हजार तर काहींनी पाच लाखांपर्यंत गुंतवणूक केली. मात्र या फसवणुकीबाबत आर्थिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच सहआयुक्त धनंजय कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच सर्वांना अटक करण्यात आली. एमपीआयडीच्या पर्यायाबाबत विचार सुरू आहे, असे सहआयुक्त कमलाकर सांगतात. या कायद्यान्वये आरोपींची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची तरतूद आहे.
अभिनेत्री लीना व साथीदारांवर एमपीआयडी?
By admin | Published: June 04, 2015 5:17 AM