२० ग्राहकांसह ३१ बारबालांनी गजबजला होता ‘आदर्श’ बार; कारवाई करून कोपरखैरणे पोलिसांनी दिला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 08:48 AM2024-04-16T08:48:10+5:302024-04-16T08:49:11+5:30
कोपरखैरणेतील आदर्श बारला पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोपरखैरणेतील आदर्श बारला पोलिसांनी पुन्हा एकदा दणका दिला. छोटेखानी जागेत डान्सबार चालवला जात होता. याची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी रविवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत बारमधून ३१ बारबाला, २० ग्राहक, तसेच ४ वेटर यांना ताब्यात घेतले.
रहिवासी क्षेत्रात व रहदारीच्या मुख्य रस्त्याला लागूनच हा बार असल्याने तिथल्या अवैध धंद्यांबाबत नागरिकांमधून तक्रारी येत होत्या. परंतु, आस्थापनेत केवळ सर्व्हिस बार चालत असल्याचा दिखावा करून आतला गैरप्रकार दडपला जात होता. मात्र, आस्थापना चालकांचे वाढते धाडस गांभीर्याने घेत कोपरखैरणेचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दोन पथकांमार्फत डान्सबारमध्ये व बाहेर सापळा लावून रविवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास कारवाई केली.
महापालिकेला जाग येईल काय?
बारच्या तळमजल्यावर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करून बार चालवला जात आहे. शिवाय बाहेरील बाजूस उघड्यावर ग्राहकांना मद्यपानासाठी बसण्याची सोय केलेली आहे. यामुळे भोवतालच्या इमारतींमधील रहिवाशांना रोज नाईलाजास्तव तळीरामांचे दर्शन घ्यावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी दोनदा दिखाऊ कारवाई केल्यानंतरही तिथले अनधिकृत बांधकाम हटू शकलेले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या माध्यमातून तिथे अनधिकृत बार चालत असतानाही प्रशासन सुस्त असल्याचे आश्चर्य देखील व्यक्त होत आहे. मात्र, रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाला जाग येईल का, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत.