नवी मुंबई : सिडकोच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय, शासकीय आणि धार्मिक वापराकरिता वाटप केलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सामान्य विकास नियंत्रण नियमावलीतील अधिनियम क्रमांक १६.३ (१ अ) क मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.सिडकोने विविध नोडमध्ये शैक्षणिक, वैद्यकीय ,धर्मादाय संस्था व शासकीय कार्यालयांसाठी भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. सदर भूखंडधारकांनी सिडकोकडे अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची मागणी केली होती. परंतु अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक ज्या निकषांवर मंजूर करण्यात येतो त्या भूखंडांचा आकार, रस्त्याची रुंदी व इतर निकषांची पूर्तता काही भूखंडांच्या बाबतीत होत नव्हती. याकरिता उपरोक्त निकषांच्या संदर्भात सिडकोने अभ्यास केला होता. या अभ्यासातील निष्कर्षांवर आधारित अतिरिक्त चटई निर्देशांक मंजूर करण्याबाबतचे धोरण सिडकोकडून आखण्यात आले. या धोरणाची कायदेशीरदृष्ट्या प्रभावी अंमलबजावणी करता यावी म्हणून त्यातील मार्गदर्शक तत्त्वे विकास नियंत्रण नियमावलीतील अधिनियम म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत व त्या अनुषंगाने उपरोक्त अधिनियमातील तरतुदींमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.सिडकाेच्या निर्णयामुळे अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, उपरोक्त निकषांची पात्रता पूर्ण करणाऱ्या भूखंडांना त्याचा लाभ मिळणार आहेत. अधिनियमांना शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ते अंमलात येतील.
सामाजिकसह धार्मिक वापराच्या भूखंडांना अतिरिक्त चटईक्षेत्र, सिडकोचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 4:23 AM