नवी मुंबई : पनवेल परिसरात सध्या पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शहरात टँकर धोरण राबविण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढावली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सिडकोने महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक भागात अतिरिक्त जलकुंभ आणि पाण्याच्या टाक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.मान्सूनला अद्यापि पाच ते सहा महिन्यांचा अवकाश आहे; परंतु पनवेल शहराला आतापासूनच पाणीटंचाईची झळ बसली आहे. विशेषत: नवीन पनवेल (पूर्व आणि पश्चिम), कळंबोली आणि कामोठे नोडमध्ये पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे.सध्या या परिसराला सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कळंबोली आणि कामोठे या नोडमध्ये अनुक्रमे ३२ एमएलडी, २७ एमएलडी आणि ३५ एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो; परंतु येथील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा पाणीपुरवठा कमी असल्याने या परिसरातील रहिवाशांना नियमित पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत सिडकोने काही महिन्यांपूर्वी या क्षेत्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांचा आढावा घेतला होता, यात अनेक त्रुटी असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार या परिसरातील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी अतिरिक्त जलकुंभ आणि पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तशा आशयाचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला आहे.दरम्यान, अतिरिक्त जलकुंभ आणि पाण्याच्या टाक्यांमुळे पाणीसाठवण क्षमता वाढून नवीन पनवेलसह कळंबोली आणि कामोठे नोडमधील पाणीप्रश्न काही प्रमाणात निकाली निघेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
पनवेल परिसरात अतिरिक्त जलकुंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:55 PM