गणेश नाईकांचा पत्ता कट; बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:15 PM2019-10-01T17:15:45+5:302019-10-01T17:15:50+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारले आहे.
नवी मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देवून महापालिकेतील 52 नगरसेवकांसह भाजपामध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून भाजपाने तिकिट नाकारले आहे. तसेच या मतदार संघातून पक्षाने पुन्हा मंदा म्हात्रे यांना संधी दिली आहे. त्यामुळे नाईक यांना हा मोठा झटका मानला जात आहे.
भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे गणेश नाईक यांचे पूत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु नाईक स्वत: इच्छूक असलेल्या बेलापूरमधून मात्र पुन्हा मंदा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे नाईक समर्थकांत कमालीची नाराजी पसरली आहे.
दरम्यान, बेलापूरच्या जागेवर शिवसेनेने दावा केला होता. परंतू नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्याने युतीचा धर्म पाळण्याचे आदेश शिवसेना पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सोमवारी नवी मुंबईतील शिवसैनिकांना दिले होते. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या अनेक पदाधिका-यांनी राजीनामे सादर केले होते.. बेलापूरमधून गणेश नाईक यांना उमेदवारी दिल्यास प्रचार करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला होता. मात्र बेलापूरमधून नाईक यांनाच डच्चू मिळाल्याने सेनेतील बंड थंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत नाईक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.