ज्वेल ऑफ नवी मुंबईला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:51 AM2019-11-21T00:51:41+5:302019-11-21T00:51:43+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या नेरु ळ येथील ज्वेल आॅफ नवी मुंबईला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. तलावात सोडण्यात आलेल्या मलवाहिन्यांच्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच उघड्यावरील केबलमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
उद्यानांचे शहर म्हणून ओळख असणाºया नवी मुंबई शहरात महापालिकेने नेरुळ येथे ज्वेल आॅफ नवी सारखे ठिकाण विकसित केले आहे, तलावाच्या सभोवताली सुमारे अडीच किलोमीटर अंतर असणारा जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, प्रसाधनगृह, पार्किंग, आधुनिक विद्युत व्यवस्था, अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांनी या ठिकाणाला पसंती दिली असून, शहरभरातून दररोज सुमारे शेकडो नागरिक या ठिकाणी येतात. भव्य जॉगिंग ट्रॅकमुळे तरुणाईबरोबर, वृद्धांचे व्यायाम करण्यासाठी येण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे. ज्वेल आॅफ नवी मुंबई या ठिकाणच्या तलावात नेरुळ गावासमोरील बामणदेव मैदान आणि गणपत शेठ तांडेल मैदानाजवळून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइपलाइन सोडण्यात आलेली आहे; परंतु या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर मलवाहिन्यांचे सांडपाणी तलावात सोडण्यात आले आहे. त्यामुळे या तलावाच्या किनाºयावर एक विशिष्ट तवंग पसरलेला आहे.
या सांडपाण्यामुळे ज्वेल आॅफ नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे या ठिकाणी येणाºया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्युत व्यवस्था करण्यासाठी टाकण्यात आलेल्या विद्युत केबल उघड्यावर असून, यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.