पनवेल : नवीन पनवेलमधील आदई तलावाच्या सुशोभीकरणाकरिता सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत. जलाशयाचे सर्वेक्षण करण्यात आले असून अंदाजपत्रकाचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीकरिता सिडकोकडे पाठविण्यात आला आहे. नवीन पनवेलमधील तलाव आदई गावाजवळ असून द्रुतगती महामार्गामुळे तलावाला मोठा फटका बसला आहे. सिमेंटच्या जंगलात हा एकमेव तलाव निसर्गाची साक्ष देतोय. मध्यंतरी हा तलाव बुजविण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र त्यास नगरसेवक संतोष शेट्टी यांनी स्थानिकांच्या मदतीने विरोध दर्शवला. तलावात गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. वास्तविक पाहता तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. असे असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, डेब्रिज टाकण्यात येते याशिवाय आजूबाजूच्या झाडांचा पालापाचोळा पडल्याने पाणी दूषित होते. त्याचा परिणाम तलावातील जलचरांवर होत आहे. नवीन पनवेलकरांसाठी या महत्त्वाच्या नैसर्गिक जलस्रोताची साफसफाई करण्याची मागणी वारंवार सिडकोकडे करण्यात आली होती. शेट्टी यांनी स्वखर्चाने तलावाची स्वच्छताही केली आहे. (वार्ताहर)
आदई तलावाचे होणार सुशोभीकरण !
By admin | Published: November 09, 2015 2:49 AM