आदई तलावाचे होणार सुशोभीकरण, लवकरच निविदा प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:24 AM2018-11-16T04:24:04+5:302018-11-16T04:24:22+5:30
लवकरच निविदा प्रक्रिया : लोकप्रतिनिधींनी केला होता पाठपुरावा
कळंबोली : रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी रामशेठ ठाकूर विचार मंचाने केली होती. त्यानुसार आराखडा तयार करून निविदा प्रक्रि या सुद्धा झाली होती. परंतु जीएसटीमुळे संबंधित एजन्सीने माघार घेतल्याने काम रखडले होते. मात्र बुधवारी पार पडलेल्या बैठकीत सिडको अध्यक्षांनी जीएसटीसह फेरनिविदा काढून हे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आदई तलावावर भूखंड तयार करून एका संस्थेच्या घशात घालून कोट्यवधी रुपयांची मलई खायचा उद्देश सिडकोतील अधिकाऱ्यांंचा होता. मात्र स्थानिक नगरसेवक संतोष शेट्टी यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी स्थानिकांना बरोबर घेऊन सिडकोच्या या धोरणाविरोधात चळवळ उभी केली. संबंधित तलाव बुजू नये याकरिता शेट्टी यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी नात्याने सिडकोवर दबाव आणला याशिवाय आजूबाजूच्या लोकांना त्यांनी जागृत केले. यामुळे तलाव बुजविण्याचा निर्णय बासनात बांधून ठेवावा लागला. त्यापाठीमागे शेट्टी यांचा लढा महत्त्वपूर्ण ठरला. हा तलाव नैसर्गिक असल्याने पावसाचे पाणी या ठिकाणी साचू शकते याखेरीज वातावरण थंड राहण्यासही मदतही होते. या ठिकाणी गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. वास्तविक पाहता तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. असे असतानाही प्रशासनाकडून याबाबत कानाडोळा केला जात होता. या तलावात मोठ्या प्रमाणात कचरा त्याचबरोबर डेब्रिज टाकण्यात येते, याशिवाय आजूबाजूच्या झाडांचा पालापाचोळा पडल्याने पाणी दूषित होते. त्याचा परिणाम तलावातील जलचरांवर पडत होता. नवीन पनवेलकरांसाठी या महत्त्वाच्या नैसर्गिक जलस्रोताची साफसफाई करण्याची मागणी वारंवार सिडकोकडे करण्यात आली आहे. या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. बुधवारी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
आदई तलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रि या झाली होती, परंतु संबंधित ठेकेदाराने जीएसटी करामुळे हे काम परवडणार नाही असे कारण देवून माघार घेतली. त्यामुळे हा आराखडा आणि इस्टिमेटमध्ये बदल करण्यात येईल. त्याचबरोबर जीएसटीसहित निविदा प्रसिद्ध करून एजन्सी नियुक्त करण्यात येईल.
- भगवान साळवी,
कार्यकारी अभियंता,
सिडको नवीन पनवेल नोड