कमलाकर कांबळे नवी मुंबई : कर्जत तालुक्यात कोंढाणे धरण राज्य सरकारने सिडकोकडे हस्तांतरित केले आहे. या धरणाच्या पाण्यातून प्रस्तावित ‘नैना’ क्षेत्रातील वसाहतींची तहान भागविण्याची सिडकोची योजना आहे. मात्र, हे धरण सिडकोला देण्यास स्थानिकांचा विरोध आहे. धरण हस्तांतरित झाल्यापासून विविध स्तरावर स्थानिकांकडून विरोध होत आहे; परंतु मागील काही दिवसांपासून हा विरोध तीव्र झाल्याने सिडकोची कोंडी झाली आहे. धरण हातचे गेल्यास प्रस्तावित ‘नैना’ क्षेत्राच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन फसण्याची भीती सिडकोला सतावत आहे.सिडकोच्या दक्षिण नवी मुंबईत पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. भविष्यात ‘नैना’ क्षेत्राचा मोठा विकास होणार आहे. लोकसंख्या वाढणार आहे. येथील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सिडकोने कोंढाणे धरणाचा पर्याय उभा केला आहे. त्यानुसार ‘नैना’ क्षेत्रापासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर व कर्जत तालुक्यापासून १३ किलोमीटर दूर असलेल्या कोंढाणे धरणाला सिडकोने पसंती दिली आहे, त्यानुसार दोन वर्षांपूर्वी हे धरण शासनाकडून हस्तांतरित करून घेण्यात आले आहे. राज्य शासनाला ९९ कोटी रुपये अदा केल्यानंतर हे धरण आता सिडकोच्या मालकीचे झाले आहे. सिडकोने या धरणाचा नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. पुढील काही महिन्यांत हा अहवाल सिडकोला प्राप्त होणार आहे. त्यानंतर कर्जतमधील उल्हासनदीवर समांतर धरण बांधण्याची सिडकोची योजना आहे. मात्र, त्याअगोदरच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले आहेत. मागील चार दिवसांपासून विविध स्तरावर बैठका घेऊन धरण सिडकोला देण्यास विरोध दर्शविला जात आहे. विशेषत: कोंढाणे धरण प्रकल्प संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. समितीचे निमंत्रक तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच एक बैठक पार पडली. धरण झाले पाहिजे; पण ते कर्जतकरांसाठी, असा पवित्रा या बैठकीत घेण्यात आला. तर मंगळवारी कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांसोबर कोंढाणे धरण परिसराची पाहणी केली. धरणाला स्थानिकांचा होत असलेला विरोध व त्यामागील कारणे याविषयी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे आमदार थोरवे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.।अधिकाऱ्यांना मज्जावमागील काही दिवसांपासून सिडकोने धरणाच्या कामाला प्राथमिक स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सिडकोचे अधिकारी कोंढाणे धरण परिसरात मोजणी करण्यासाठी आले होते. मात्र, शेतकऱ्यांनी या अधिकाºयांना मोजणीसाठी मज्जाव केल्याने तूर्तास हे काम बंद करण्यात आले आहे.।१०५ दशलक्ष घनमीटरपाणीसाठा होणारकोंढाणा धरणाची यापूर्वी ३९ मीटर उंची प्रस्तावित होती, तर पाणलोटक्षेत्र ५३ मीटर इतके होते; परंतु सिडकोने ही उंची आणखी ३२ मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७१ मीटर उंचीच्या या धरणात आता १०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे. या पाण्यामुळे सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्रातील नियोजित नागरी वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा सिडकोचा मानस आहे.
कोंढाणे धरणावरून सिडको प्रशासनाची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:10 AM