नवी मुंबई : अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला एपीएमसीमधील भूखंडावरील झोपडी हटवण्यात प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. त्या ठिकाणी मागील काही वर्षांत अनेकदा कारवाई करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्येक कारवाई अर्धवट होत असल्याने दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी पुन्हा झोपडी उभारल्याचे चित्र दिसून येत आहे.एपीएमसी आवारातील सात क्रमांकाचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झोपडींचे साम्राज्य उभे करण्यात आले आहे. या झोपडींच्या आडून एपीएमसी आवारातील अमली पदार्थ विक्रीचे रॅकेटही चालवले जात आहे. मागील कित्येक कारवार्इंमध्ये गांजा तसेच इतर अमली पदार्थ विक्री प्रकरणी या झोपडींमध्ये वास्तव्याला असणाºया महिला व पुरुषांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे ही झोपडपट्टी पोलिसांचीही डोकेदुखी ठरत आहे. त्यानुसार पोलिसांनीही सिडको तसेच पालिका प्रशासनाला तिथले अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्याच्या सूचना केल्या आहेत; परंतु मागील चार वर्षांत त्या ठिकाणी अनेकदा कारवाई झाली असून, प्रत्येक कारवाईच्या दुसºयाच दिवशी त्या ठिकाणी पुन्हा झोपडी उभारण्यात आल्या आहेत.कारवाई केल्यानंतर झोपडींचे साहित्य जप्त केले जाणे आवश्यक असतानाही अर्धवट कारवाई केली जात आहे. तर एकदा कारवाईसाठी आलेल्या पथकाला झोपडपट्टीतील रहिवाशांच्या विरोधालाही सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे आजवर त्या ठिकाणी कारवाईसाठी झालेला खर्च व्यर्थ ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामागे अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचाही अभाव असल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, भविष्यात एखाद्या विकासकाला या भूमाफियांच्या विरोधाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतही अशाच प्रकारे झोपडींनी बळकावलेला भूखंड मोकळा करण्यासाठी प्रशासनाला अनेक प्रयत्न करावे लागले होते. परिणामी, कारवाई वेळी पोलिसांवरही दगडफेक झाल्याचा प्रकार त्या ठिकाणी घडला होता. यानंतरही अद्यापपर्यंत भूखंडावरून पदपथांवर आलेल्या झोपडींना हटवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. हीच परिस्थिती एपीएमसी आवारातील मोकळ्या भूखंडांच्या भोवती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एपीएमसीमधील झोपडपट्टी हटवण्यात प्रशासन अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:31 AM