पदपथांवरील झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:54 AM2019-06-13T01:54:16+5:302019-06-13T01:54:24+5:30
कोपरखैरणेतला प्रकार : अनेकदा कारवाईनंतरही झोपड्या कायम
नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगतच्या अनधिकृत झोपड्यांवर सातत्याने कारवाई करून देखील त्या हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. सिडकोच्या भूखंडावरील या झोपड्यांवर कारवाई झाल्यानंतर त्यांनी पदपथ बळकावले आहेत. यामुळे परिसराला बकालपणा आला असून नागरिकांचीही गैरसोय होत आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगतच्या मोकळ्या जागेत झोपड्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. परिसरातील भिकाऱ्यांनीही त्याठिकाणी आपले बस्तान मांडले असून दिवसभर परिसरातून जमा केलेला कचरा देखील त्यांच्याकडून परिसरात साचवला जात आहे. या झोपड्यांमध्ये राहणारे महिला, पुरुष व लहान मुले रेल्वेस्थानक तसेच जवळच्याच चित्रपटगृहाबाहेर पादचाऱ्यांना त्रास देऊन भीक मागण्याचे काम करतात. यामुळे अनेकांना आपला मार्ग बदलावा लागत आहे, तर अनेकदा हटकल्यानंतरही ते जात नसल्याने सदर झोपड्या त्याठिकाणावरून हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु अनेकदा कारवाई केल्यानंतरही या झोपड्या त्याठिकाणावरून हटत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी तिथला भूखंड विकासकाला वितरित झाल्यानंतर सिडको व पालिकेने संयुक्तरीत्या त्याठिकाणी कारवाई केली होती. मात्र, कारवाईवेळी झोपडपट्टीतल्या रहिवाशांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले होते. अखेर पोलिसांच्या बळाचा वापर करून सदर भूखंड मोकळा करण्यात आला. मात्र, यानंतर त्यांना सदर ठिकाणावरून हटवणे आवश्यक असतानाही प्रशासनाने त्याकडे कानाडोळा केल्याने तिथल्या पदपथांवर या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर झोपड्यांवर कारवाई करून परिसरातील नागरिकांना भिकाºयांच्या त्रासातून मुक्त करण्याची मागणी होत आहे.