नवी मुंबईतील अनधिकृत झोपड्या हटवण्यात प्रशासन अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 02:30 AM2019-05-08T02:30:24+5:302019-05-08T02:31:00+5:30
मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
नवी मुंबई : मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य हटवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. बहुतांश ठिकाणी तीनपेक्षा अधिक वेळा कारवाया होऊनही पुन्हा तिथे झोपड्या थाटल्याचे चित्र अनेक नोडमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईला अनधिकृत झोपड्यांचा विळखा बसू लागला आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता अभियानाला बाधा निर्माण होत आहे, तर झोपड्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना थारा मिळत असल्याने त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. परिणामी शहरातील अनधिकृत झोपड्या मोठी डोकेदुखी ठरत चालल्या आहेत. अशा झोपड्या वेळीच हटवण्याची मागणी यापूर्वी अनेकदा पोलिसांनी देखील केलेली आहे. त्यानुसार अनेकदा अशा झोपड्यांवर कारवाई देखील केली जाते. मात्र, दुस-या दिवशीच पुन्हा त्याठिकाणी झोपड्या उभ्या राहत असल्याचेही पाहायला मिळते. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये असे अनेक भूखंड आहेत, ज्यावरील झोपड्यांवर सिडको अथवा पालिकेने अनेकदा कारवाया केल्या आहेत. यानंतरही झोपड्या कायमस्वरूपी हटत नसल्याने दोन्ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगत एका भूखंडावर कारवाईवेळी पोलिसांवर दगडफेकीचाही प्रकार घडला होता. त्यामध्ये जखमी झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून या झोपड्या हटवण्यात आल्या होत्या; परंतु कारवाईच्या काही दिवसानंतर पुन्हा त्याठिकाणी दुपटीने झोपड्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पदपथांवर देखील ताबा मिळवला असून संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरवले आहे. त्याचप्रमाणे एपीएमसी येथील माथाडी भवन चौकालगतच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या शेजारील भूखंडावर देखील वर्षानुवर्षे हेच चित्र दिसून येत आहे. त्याठिकाणी झोपड्यांमध्ये गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. त्यावर एपीएमसी पोलिसांनी अनेकदा कारवाई देखील केलेली आहे.
मात्र, काही दिवसांनी पुन्हा झोपड्यांच्या आडून त्याठिकाणी अमली पदार्थ विक्रीचे अड्डे चालवले जात आहेत. या झोपडपट्टीवर मागील काही वर्षात सात ते आठ वेळा कारवाई झालेली आहे. यानंतरही सदर झोपडपट्टी हटण्याऐवजी तिथल्या झोपड्यांमध्ये वाढच होताना दिसून येत आहे. परिणामी रात्री अपरात्री सदर मार्गाने पायी चालत जाणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अनधिकृत झोपड्यांवर कारवाईनंतर त्याठिकाणी कुंपण घालण्याची मागणी होत आहे.