आविष्कार देसाई, अलिबागटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरसाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रसिध्द केली होती. त्या निविदेला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यातच पेण तालुक्यातील ९ गावे आणि ३५ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. परंतु टँकरअभावी जिल्हा प्रशासन हतबल असून, नागरिकांना एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.रायगड जिल्ह्यात सुमारे ७ कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. २०१५-१६ या कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये ६० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. प्रचंड उष्णतेमुळे त्यामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. हेटवणे धरण उशाला असूनही टंचाईचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातून आतापर्यंत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आलेली आहे. पेण तालुक्यामधील पाच वाड्यांची मागणी आधीच आली आहे. परंतु सरकारी टँकर नादुरुस्त असल्याने तेथे सध्या पाणीपुरवठा थांबलेला आहे. खालापूर तालुक्यातील एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील नऊ गावे आणि ३५ वाड्यांनी टँकरची मागणी केली आहे. प्रशासनाकडे सरकारी मालकीचे दोनच टँकर आहेत. त्यातील एक टँकर सध्या नादुरुस्त आहे. त्यामुळे एकच टँकर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांची तहान कशी भागविणार, असा प्रश्न पडला आहे. जिल्हा प्रशासनाने वृत्तपत्रामार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहिरात देऊन निविदा मागविल्या होत्या. २१ मार्चला ई-टेंडरिंग होणार होते.
टँकरसाठी प्रशासन हतबल
By admin | Published: March 23, 2016 2:21 AM