गणरायाच्या निरोपासाठी प्रशासन सज्ज, ठकठिकाणी गणेशमूर्तींवर होणार पुष्पवृष्टी; विसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 02:56 AM2017-09-05T02:56:04+5:302017-09-05T02:56:13+5:30
अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनात कोणत्याच प्रकारचे विघ्न येवू नये याकरिता विसर्जन स्थळासह महत्त्वाच्या ठिकाणी शहर व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे
नवी मुंबई / कळंबोली : अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाºया श्री गणेशाच्या विसर्जनासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जनात कोणत्याच प्रकारचे विघ्न येवू नये याकरिता विसर्जन स्थळासह महत्त्वाच्या ठिकाणी शहर व वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे, तर पालिकेतर्फे वाशीतील शिवाजी चौकात गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टीची सोय करण्यात आली आहे.
मोठ्या भक्तिभावाने स्थापना झालेल्या श्री गणेशाला जड अंत:करणाने निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यानुसार अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मंगळवारी दहा दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ६० हून अधिक विसर्जन स्थळांवर गणरायाला निरोप दिला जाणार आहे. त्याकरिता पोलिसांसह नवी मुंबई व पनवेल महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २३ विसर्जनस्थळांवर स्वयंसेवक, तराफे, निर्माल्य कलश यासह प्रथमोपचाराची सोय करण्यात आलेली आहे. त्याशिवाय सर्वच विसर्जनस्थळांवर पालिकेतर्फे फोर्कलिफ्ट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मंगळवारी विसर्जन होणाºया मूर्ती मोठ्या आकाराच्या असल्याने त्या उचलून तराफ्यामध्ये ठेवण्याकरिता फोर्कलिफ्टचा उपयोग होणार आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण व सर्वाधिक जास्त गणेशमूर्तींचे विसर्जन वाशी विभागात होते. त्यानुसार यंदाही वाशीतील शिवाजी चौकात पालिकेतर्फे गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
पालिकेतर्फे यंदा प्रथमच वाशी व शिरवणे येथील विसर्जनस्थळांवर आकर्षक बुथ मांडण्यात आले आहेत. त्याठिकाणी गणेशाची मूर्ती ठेवून विसर्जनापूर्वीची आरती करण्याची सोय भक्तांसाठी करण्यात आली आहे. या बुथच्या माध्यमातून नागरिकांना शहर स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. महापालिका व सेतू जाहिरात कंपनीतर्फे नवी मुंबईत प्रथमच ही संकल्पना राबवली जात आहे.
गणेशभक्तांकडून विघ्नहर्त्याला निरोप दिला जात असताना कोणतेच विघ्न येवू नये याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. संपूर्ण आयुक्तालयात बाराशेहून अधिक कर्मचारी बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच निश्चित ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त लागणार आहे. त्याकरिता पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त प्रशांत बुरडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे व परिमंडळ दोनचे उपआयुक्त राजेंद्र माने यांनी परिसराचा आढावा घेतला आहे. दोन्ही परिमंडळामध्ये आवश्यक ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीतल्या गैरहालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. त्याशिवाय साध्या वेशातील पोलीस, पोलीस मित्र संघटना यांच्याकडूनही संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तर एखादा अनुचित प्रकार घडल्यास परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, वज्र वाहन व स्ट्रायकिंग फोर्स देखील सज्ज ठेवण्यात आले आहे.
पनवेल तालुक्यातील विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीचा वॉच
1अनंत चतुर्दशीनिमित्त पनवेल विभागात गणेश विसर्जन घाटावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याकरिता सहाशेपेक्षा जास्त कर्मचारी बंदोबस्ताला असतील. त्याचबरोबर विसर्जन घाटांवर ३५० सीसीटीव्हींची नजर राहणार आहे. घाटावर तात्पुरत्या पोलीस चौक्या थाटण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. पनवेल विभागात बारा दिवसांचे १४६ सार्वजनिक आणि खासगी ११,३३५ इतके गणपती आहेत.
2मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी या सर्व बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. पनवेल शहर, सिडको वसाहतीतील सार्वजनिक आणि खासगी गणपतींचे वाजतगाजत विसर्जन केले जाते. बाप्पांचे विसर्जन शांततेत पार पाडावे त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस उपायुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
3रोडपाली, खांदेश्वर, आदई, वडाळे, छोटा खांदा, कामोठे, बेलपाडा, स्पॅगेटी, रोहिंजण, तळोजा, नावडे येथील तलावात बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. याशिवाय कोळीवाडा आणि नवीन पनवेल येथे गाढी नदीच्या विसर्जन घाटावर गणपतींना निरोप दिला जातो. या ठिकाणी स्टेज, लाऊड स्पीकर, पब्लिक अनाऊंस सिस्टीम असणार आहे. विसर्जनाकरिता स्वयंसेवक असणार असून त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असेल. स्थानिक कोळी बांधवांचेही सहकार्य घेतले जाणार आहे.
4पोलीस कर्मचाºयांना अतिरिक्त ४२ वॉकी टॉकी देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना सूचना व माहिती देण्याकरिता फलक लावण्यात आले आहेत. तसेच विसर्जन घाटावर महावितरण कर्मचाºयांबरोबरच रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन बंब, क्रे नची व्यवस्था सिडको आणि महापालिकेकडून करण्यात आली आहे. एसआरपी आणि आरसीपीकडून अतिरिक्त मनुष्यबळ विसर्जन बंदोबस्ताकरिता मागविण्यात आले आहे.