कोरलवाडी आदिवासींच्या रस्त्याला प्रशासकीय मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:05 AM2020-08-10T00:05:12+5:302020-08-10T00:05:15+5:30
इतर मागण्याही तत्त्वत: मान्य; उपोषण पुकारल्याने प्रशासनाची उडाली तारांबळ
पनवेल : वारंवार पत्रव्यवहार आणि मोर्चे काढूनही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही कोरलवाडी आदिवासींना रस्ता, पाणी आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा नाकारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवून, रविवारी जागतिक आदिवासी दिनी कोरलवाडी आदिवासी बांधवांनी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले. यानंतर शासकीय पातळीवर हालचालींना वेग येऊन आदिवासी वाडीच्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुदास वाघे, संतोष पवार, हरिश्चंद्र वाघे, रमेश वाघे, राजेश वाघे, भानुदास पवार, शकुंतला पवार, गोंदीबाई वाघे, बेबी दशरथ वाघे ग्राम संवर्धन सामजिक संस्थेचे कार्यकर्ते उदय गावंड, राजेश रसाळ यांनी पनवेल प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या हत्याराने बावीस दिवस निद्रिस्त असलेल्या महसूल विभागाची मात्र धावपळ उडाली आणि दुपारनंतर पनवेलचे निवासी नायब तहसीलदार संजय मांडे, मंडळ अधिकारी मनीष जोशी, तलाठी कविता बळी आणि कर्नाळा तलाठी बलभीम लाटे यांच्यासह उपोषण स्थळी भेट देत, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७( नवीन ६६) ते कोरलवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणद्वारा २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७ लाख ५० हजारांच्या आराखड्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंबंधी शासन स्तरावर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
१३ आॅगस्ट रोजी पनवेलच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.