पनवेल महापालिके साठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू
By admin | Published: April 7, 2016 01:22 AM2016-04-07T01:22:10+5:302016-04-07T01:22:10+5:30
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त झाली आहे. येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी ही नवी महापालिका अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत.
कमलाकर कांबळे, नवी मुंबई
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला गती प्राप्त झाली आहे. येत्या महाराष्ट्र दिनापूर्वी ही नवी महापालिका अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीची ११ एप्रिलला अंतिम बैठक होत आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३0 एप्रिलपर्यंत पनवेल महापालिकेची अधिकृत स्थापना होण्याची शक्यता उच्चपदस्थ सूत्राने वर्तविली आहे.
प्रस्तावित महानगरपालिकेत पनवेल तालुक्यातील १७३ पैकी ६६ गावे, आठ सिडको वसाहती व पनवेल शहराचा समावेश आहे. या नव्या महापालिकेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका पार पडल्या आहेत. या अभ्यास समितीकडून पनवेल महानगरपालिका कशी असावी, त्याची भौगोलिक रचना, आर्थिक स्रोत व पायाभूत सुविधांवरील खर्च याविषयी अभ्यास केला आहे. यात पाणीपुरवठ्याचा ही आढावा घेण्यात आला आहे. अभ्यास समितीने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार प्रस्तावित महापालिकेची लोकसंख्या ८ लाखांच्या घरात पोहचली आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार या नव्या महापालिकेचा समावेश ड वर्गात होण्याची शक्यता आहे. संभाव्य तांत्रिक मुद्यांच्या आधारावर या महापालिकेला क दर्जा मिळावा यासाठी प्रशासकीय स्तरावर पयत्न सुरू आहेत.
अभ्यास समितीची अंतिम बैठक ११ एप्रिल रोजी होणार आहे. या बैठकीनंतर ही समिती तातडीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. एकूणच महाराष्ट्र दिनापूर्वी म्हणजे ३० एप्रिल २०१६ पर्यंत पनवेल नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर व्हावे, यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.