नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ३० एप्रिलला होणाऱ्या पूर्वपरीक्षेत ९४ हजार उमेदवारांच्या प्रवेशपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एमपीएससीचे संकेतस्थळ हॅक करून अज्ञाताने या प्रवेशपत्रिका चोरी करून त्या व्हायरल केल्या आहेत. त्याशिवाय पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका देखील त्यांच्याकडे असल्याचा दावा टेलिग्राम ग्रुपवर करण्यात आला आहे. हा प्रकार निदर्शनास येताच सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील विविध अराजपत्रीत गट ब, गट की संवर्गातील पदभरतीची पूर्वपरीक्षा ३० एप्रिलला होणार आहे. हि परीक्षा ४ लाख ६६ हजार ४५५ उमेदवार देणार आहेत. नवी मुंबई, मुंबईसह राज्यातील ३७ जिल्ह्यातील १ हजार ४७५ केंद्रांवर हि परीक्षा होणार आहे. त्यानुसार परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी उमेदवारांना आवश्यक असलेले प्रवेशपत्र एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक उमेदवार त्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे ते स्वतःचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेऊ शकतात. मात्र टेलिग्रामवर मोठ्या संख्येने एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र व्हायरल होत असल्याचे एका उमेदवाराच्या लक्षात आले. हि बाब त्याने लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाला कळवली असता, सहसचिव सुनील अवताडे यांनी याप्रकरणी सीबीडी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात व्यक्तीने एमपीएससीच्या संकेतस्थळावरून साडेचार लाख उमेदवारांपैकी सुमारे ९४ हजार उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक करून ते व्हायरल केले आहेत. तसेच ज्या ग्रुपवर ते व्हायरल केले गेले त्याच ग्रुपवर पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका देखील त्याच्याकडे असल्याची पोस्ट टाकली आहे. शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांसह इतरही माहिती त्याच्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यानुसार याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.