अल्पवयीन मुले शोधताहेत घराबाहेर प्रेमाचा ‘आधार’; बेपत्ता ३२५ जणांचा लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 07:57 AM2023-12-09T07:57:59+5:302023-12-09T07:58:07+5:30
गेल्या वर्षभरात बेपत्ता ३७१ मुलांपैकी ३२५ जणांचा लागला शोध
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : शहरातून अल्पवयीन मुले, मुली बेपत्ता होत असून, अशा घटनांनी पालक चिंतित आहेत, तर बेपत्ता होणारी मुले अल्पवयीन असल्याने याप्रकरणी संबंधितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. अशाच प्रकारातून चालू वर्षात ११ महिन्यांत नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातून ३७१ मुले बेपत्ता झाली असता ३२५ जणांचा शोध लागला असून, ४६ जणांची कसलीही माहिती समोर आलेली नाही.
चालू वर्षात ११ महिन्यांत नवी मुंबईसह पनवेलमधून ३७१ अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. यासंबंधीची तक्रार प्राप्त होताच स्थानिक पोलिस तसेच गुन्हे शाखेकडून तपास करण्यात आला. त्यामध्ये ३२५ बालकांचा शोध लागला असल्याचे गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले,
सर्वांच्या बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक, तसेच प्रेमसंबंधाचे कारण समोर आले आहे. पालकांकडून मुलांना प्रेम मिळत नसल्याने ही मुले इतरांच्या आहारी जात असावीत. - अमित काळे, उपायुक्त, गुन्हे शाखा.
एक ना अनेक कारणे
अल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक कारणांसह प्रेमप्रकरण अशी कारणे समोर आली आहेत, तर बेपत्ता झालेली व मिळून आलेली सर्व मुले, मुली ही मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबातील आहेत. नोकरी, व्यवसायामुळे घराबाहेर असणाऱ्या या कुटुंबांतील मुला-मुलींना पालकांकडून प्रेमाचा आधार मिळत नाही. लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेल्याचेही अनेक घटनांमध्ये समोर आले आहे.
अफवांमुळे पालक चिंतित
शहरातून अल्पवयीन मुलांचे अपहरण होत असल्याच्या अफवांचे पीक मागील काही दिवसांपासून उठले आहे. यामागे वेगवेगळ्या कथा जोडल्या जात असल्याने लहान मुलांचे पालक चिंतित झाले आहेत; परंतु अल्पवयीन मुले बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक तसेच खासगी कारणे असल्याचे बहुतांश घटनांमध्ये पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे मुले बेपत्ता होण्यामागे शहरात कोणतीही टोळी सक्रिय नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट केले जात आहे.