अरूणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल तालुक्यातील दहा अंगणवाड्या अत्याधुनिक होणार आहेत. त्या अमेरिकेतील आयबीएम सॉफ्टवेअर कंपनीने दत्तक घेतल्या आहेत. कंपनीचे तीन प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून पनवेलच्या दौ-यावर असून त्यांनी शुक्र वारी याबाबत अधिकृत घोषणा केली. संबंधित कंपनी युनाटेड वेज व महिला विकास व शिशू संस्था मुंबई या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवणार आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प पनवेल-२ने गेल्या काही महिन्यात पनवेल तालुक्यात कुपोषणमुक्तीच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. या विभागाने युनाटेड वेज व महिला विकास व शिशू संस्था मुंबई या संस्थेच्या मदतीने प्रकल्पातील १८१ अंगणवाड्यातील २0,000 बालकांचा सर्व्हे केला. त्यामध्ये सॅम आणि मॅमसह कमी वजनाची ८३७ बालके आढळून आली. त्यात आदिवासी वाडी वस्ती, स्थलांतरित बालकांचाही समावेश होता. त्यांची वैद्यकीय तपासणी करून विशेष पोषण आहाराकरिता निवड करण्यात आली.या मुलांचे वजन वाढविण्याकरिता आहार तज्ज्ञांचा सल्ला घेवून एक ठोस कार्यक्र म तयार करण्यात आला. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, पर्यवेक्षिका पी.पी कदम, जे.एम. गांधी, व्ही.एन.तांडेल, दीपा मटकर. ए.जी दाते यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हे अभियान यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले.युनाटेड वेजचे वरिष्ठ व्यवस्थापक अनिल परमार यांच्यासह दोनही संस्थांकडून या अभियानाकरिता पुढाकार घेतला आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोनही संस्थांच्या माध्यमातून बुधवार आणि गुरूवारी आयबीएम कंपनीचे पावला डायलीक, राकेश रजन, अँलेसॅन्ड्रो कॅमरा हे तीन सोशल डिपार्टमेंटचे प्रतिनिधी पनवेलला आले. त्यांनी पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी कोणत्या अडचणी आहेत याबाबत माहिती करून घेतली.या कंपनीने प्राथमिक स्वरूपात दहा अंगणवाड्या दत्तक घेण्याची तयारी दर्शवली. नावडे येथे युनाटेड वेज कंपनीकडून प्रोजेक्ट पोषण प्रकल्प यशस्वी झाला त्याबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचापरदेशी पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक अरविंद म्हात्रे, हरेश केणी उपस्थित होते.>अंगणवाड्यांचा लूक बदलणारआयबीएमकडून संबंधित अंगणवाड्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानंतर इमारतींची दुरूस्ती केली जाईल. त्याचबरोबर सर्व पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या जातील. त्यामध्ये सुशोभीकरण, फर्निचर, खेळणी असतील.नेवाळी, टेंभोडे, वांगणी, नेरे, भोकरपाडा, वाकडी, खानाव, दुंधरे पाडा, विघर, नितळस या अंगणवाड्यांचा कायापालट होणार.
पनवेल तालुक्यातील दहा अंगणवाड्या दत्तक, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 2:27 AM