कळंबोली : कळंबोली वसाहतीच्या प्रवेशद्वारावर एका खासगी कंपनीने जाहिरातीसाठी होर्डिंग उभारले आहे. सोसायटीच्या आवारात असलेल्या या होर्डिंगसाठी बाजूच्या झाडांचा बळी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केमिकलचा वापर करून ही झाडे सुकविण्यात आल्याची चर्चा असून सुकलेले झाड पालिकेने आता तोडून टाकले आहे. एकीकडे धोकादायक झाडे तोडण्यास महापालिका टाळाटाळ करत असताना होर्डिंगला आड येणारी झाडे तोडण्यास इतकी तत्परता का दाखवते, असा सवाल कळंबोलीकरांनी उपस्थित केला आहे.कळंबोली वसाहतीत सेक्टर १ मधील बिल्डिंग नं. १ ते ६ च्या आवारातील एकूण नऊ झाडांवर केमिकलद्वारे एक प्रकारे विषप्रयोग करण्यात आला, त्यामुळे हिरवीगार बहरत असलेली ही झाडे अचानक सुकली. त्यांची पानगळ झाली आणि फक्त खोड व फांद्या शिल्लक राहिल्या. काही दिवसांनी म्हणजेच मार्च महिन्यात सोसायटीच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी रात्रीतून जाहिरात फलक उभारण्यात आले. त्यानंतर ही झाडे का सुकली? याचा सुगावा कळंबोलीकरांना लागू लागला. याबाबत कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आवाज उठवला. त्यांनी या संदर्भात तक्र ार पनवेल महानगरपालिका शासकीय यंत्रणांकडे केली. या झाडांवर विषप्रयोग करून ती मारण्यात आल्याचा त्यामध्ये उल्लेख होता. पनवेल महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने असे काही घडलेच नाही, असे स्पष्टीकरण देऊन या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत धोकादायक झाडे तोडण्याची मागणी महापालिका क्षेत्रात होत आहे. ही आमची जबाबदारी नाही. पहिले पैसे भरा, तुम्ही सिडकोकडे जा, त्यांची परवानगी घ्यावी लागेल, अर्ज करा मग पाहू, अशा प्रकारची उत्तरे महापालिकेकडून दिले जातात; परंतु होर्डिंग आड येणारी ही सुकलेली झाडे तोडण्याचे काम पनवेल महानगरपालिकेने हाती घेतले. एकीकडे आमच्या जीवावर बेतणारे झाडांची छाटणी करा, अशी विनंती नागरिक करीत आहेत. तर दुसरीकडे रहिवाशांना विचारणा करून झाडे सुकली असल्याचे जाहीर करत ती शुक्रवारपासून तोडण्यास सुरुवात केली आहे.कळंबोली शिवसेना शाखेच्या महामार्गालगत असलेली झाडे तोडली आहेत. जेणेकरून फलकावरील जाहिरात दिसण्यासाठी केलेला हा खटाटोपच म्हणावा लागेल, असे कळंबोलीकरांचे म्हणणे आहे. महापालिकाद्वारे या प्रकरणाची शहानिशा न करताच झाडे तोडली, अशी प्रतिक्रि या रणवरे यांनी दिली. या संदर्भात महापालिकेचे सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.महापालिकेचा निष्काळजीपणा : जाहिरात फलक उभारण्यासाठी विविध कंपन्यांना परवानगी दिली जाते. त्यानंतर मोठमोठे जाहिरात फलक उभारले जातात; पण या फलकाला वापरलेले लोखंड योग्य आहे की नाही. त्याचबरोबर फलकांची फिटिंग तसेच जमिनीवर केलेले खोदकाम योग्य आहे की नाही, ते तपासले जात नाही, यासाठी माती परीक्षणही करावे लागते. या चाचण्या न करताच महापालिकेकडून परवानगी दिली जाते. फलक हा सोसायटीलगतच उभारला गेल्याने पुण्यासारखा अपघात कळंबोलीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जाहिरातीसाठी झाडांचा बळी; कळंबोली वसाहतीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:46 AM