पनवेलमध्ये लवकरच जाहिरात धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:57 AM2018-10-15T00:57:12+5:302018-10-15T00:57:26+5:30

- अरुणकुमार मेहत्रे  कळंबोली : पनवेल महानगरपालिका हद्दीत यापुढे विनापरवाना होर्डिंग्स आणि फलक लावण्यावर निर्बंध येणार आहेत. त्या दृष्टीने महापालिकेने ...

Advertising policy in Panvel soon | पनवेलमध्ये लवकरच जाहिरात धोरण

पनवेलमध्ये लवकरच जाहिरात धोरण

Next

- अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : पनवेल महानगरपालिका हद्दीत यापुढे विनापरवाना होर्डिंग्स आणि फलक लावण्यावर निर्बंध येणार आहेत. त्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या संदर्भात नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर शहरात कोणालाही विनापरवाना व मनमानी पद्धतीने होर्डिंगबाजी करता येणार नाही.


होर्डिंग्स व बॅनर्समुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण होत आहे. चौकाचौकांत, नाक्यानाक्यांवर शुभेच्छांचे बॅनर्स लावले जात आहेत. सण-उत्सव तर राजकीय पक्षांचे हक्काचे दिवस असतात. या काळात सर्वच राजकीय पक्षांत होर्डिंगबाजीची स्पर्धा लागलेली असते. वसाहतीच नव्हे, तर महामार्ग व अंतर्गत रस्त्यावर लावण्यात आलेल्या माहिती व दिशादर्शक फलकावरही बॅनर चिकटवले जातात. झाडांना खिळे मारून फलक लावले जात आहेत. कळंबोलीचा करवली नाका, कामोठे प्रवेशद्वार, खांदा कॉलनीतील शिवाजी चौक, नवीन पनवेलचे शिवा संकुल, एचडीएफसी व आदई सर्कल, खारघरमधील हिरानंदानी परिसर बारामाही बॅनर्स व होर्डिंग्सने सजलेला असतो. या विनापरवाना होर्डिंग्सवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु अधूनमधून होणारी ही कारवाईसुद्धा कुचकामी ठरली आहे, त्यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. गणेश देशमुख यांनी होर्डिंगसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचा ठराव महासभेत आणला जाणार आहे. डीपीआर तयार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


प्रस्तावित नव्या धोरणानुसार पनवेल शहरासह मनपा हद्दीत येणाऱ्या सिडको वसाहती, समाविष्ट गावांमध्ये हे धोरण निश्चित करण्यात येणार आहे, त्यामुळे यापुढे कुठेही बॅनर होर्डिंग्स लावता येणार नाहीत. ठरवून दिलेल्या पॉइंटवर ते लावण्याची मुभा असेल, त्याकरिता पैसे अदा करावे लागणार आहेत. होर्डिंग्स आणि बॅनरकरिता ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ असे झोन पाडण्यात आलेले आहेत. महामार्ग ‘अ’मध्ये येतो, त्याचबरोबर ‘ब’ झोनमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांचा समावेश आहे, तर ‘क’, ‘ड’ झोनचा सामावेश आतमधील रस्ते आणि चौकामध्ये करण्यात आला आहे.

 

शहरांमध्ये विनापरवानगी लावण्यात आलेले बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्स, फ्लेक्स, फलक लावू नयेत, या व्यतिरिक्त झाडांवर खिळे मारून इजा करू नये, अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका

 

Web Title: Advertising policy in Panvel soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल