पनवेल प्रांताधिकाऱ्यांविरोधात वकिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:36 PM2019-11-18T23:36:13+5:302019-11-18T23:36:15+5:30
कार्यपद्धतीबाबत नोंदविला आक्षेप; न्यायालयीन दाव्यांवर सुनावणी न करण्याची मागणी
कळंबोली : पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्याविरोधात वकील संघटनेने दंड थोपटले आहेत. त्यांनी नवले त्यांच्या न्यायालयीन कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी पनवेलमध्ये वकीलांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तर संघटनेद्वारे तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला. त्यापुढे पनवेलमध्ये दाव्यांवर सुनावणी घेऊ नये, अशी मागणी वकिलांनी यावेळी केली.
महसुली दावे हे तहसीलदार आणि त्यानंतर प्रांताधिकारी यांच्याकडे चालतात. वादी प्रतिवादी त्यांच्यासमोर युक्तिवाद करतात. तहसील कार्यालयात निकाल लागल्यानंतर समाधानकारक निकाल न मिळाल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील केले जाते. ते याप्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देतात. एक प्रकारे येथे न्यायालयीन प्रक्रिया चालते. प्रांताधिकारी न्यायदंडाधिकारी असतात. त्यांच्याकडे अनेक महसुली दाव्यांच्या प्रकरणाची सुनावणी होते. पनवेलचे प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या कार्यपद्धतीवर पनवेल तालुका वकील संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. नवले यांच्याकडून पक्षकारांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे सुनावणी केली जाऊ नये, असा ठराव वकील संघटनेच्यावतीने अगोदरच करण्यात आला आहे.
पनवेलचे प्रांत अधिकारी मनमानी करतात. तसेच वकिलांचा अपमान करीत असल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. त्यांच्याकडून न्यायालयीन मर्यादा राखली जात नसल्याचेही संघटनेच्या सभासदांचे म्हणणे आहे. याविरोधात संघटनेचे अध्यक्ष अॅड मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाºयावर कार्यालयावर वकिलांनी मोर्चा काढला. पनवेल तालुक्यात प्रांताधिकारी सारख्या अधिकारी विरोधात पहिल्यांदाच वकिलांना मोर्चा काढला.
माझ्या कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. आपण कोणतीही मनमानी करीत नाही, तसेच वकिलांचा अपमान करण्याचाही विषय येत नाही. न्यायालयीन मर्यादा सांभाळून हे कामकाज सुरू असते. काही वकिलांच्या विरोधात निकाल गेल्याने त्यातून अशा गोष्टी घडल्या आहेत.
- दत्तात्रय नवले, प्रांताधिकारी, पनवेल
पनवेलचे प्रांत अधिकारी हे न्यायदंडाधिकारी आहे, परंतु ते न्यायालयीन मर्यादा पाळत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. ते वकिलांना अपमानित करतात, तसेच मनमानी कारभार करतात. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षकारांना न्याय मिळेल ही अपेक्षा उरली नाही. यापुढे महसुली न्यायालयीन दावे त्यांच्याकडे आम्ही चालविणार नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांकडे ही वकील संघटनेने तक्रार केली आहे.
- अॅड. मनोज भुजबळ,
अध्यक्ष, पनवेल तालुका वकील संघटना.