अडवली भुतावलीमधील डेब्रिजचे पडसाद विधानसभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:55 AM2017-08-05T02:55:39+5:302017-08-05T02:55:39+5:30
अडवली भुतावलीमध्ये शेकडो एकर जमिनीवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजच्या प्रश्नाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार मंदा म्हात्रे यांनी आदिवासींसह शेतक-यांवर अन्याय करणा-या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई : अडवली भुतावलीमध्ये शेकडो एकर जमिनीवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजच्या प्रश्नाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार मंदा म्हात्रे यांनी आदिवासींसह शेतक-यांवर अन्याय करणा-या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माफियाराज संपविण्यात यावे अशी भूमिका मांडली आहे.
नवी मुंबईमधील अडवली भुतावली परिसरामधील ३५५ हेक्टर वनजमीन व ९५ एकर खाजगी जमिनीवर निसर्ग उद्यान उभारण्यात येणार होते. परंतु मागील काही वर्षांपासून येथील वनजमिनीला लागून असलेल्या खाजगी जमिनीवर डेब्रिज माफियांनी भराव करण्यास सुरवात केली आहे. सातत्याने चार ते पाच वर्षे रोज शेकडो डंपरमधून डेब्रिज खाली करण्यात आले आहे. ६० ते ७० फूट उंचीची डेब्रिजची टेकडी तयार झाली आहे. माफियांनी बोनकोडेमध्ये वास्तव्य करत असलेल्या आनंद नाईक व इतर शेतकºयांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या जमिनीच्या चारही बाजूने डेब्रिजची टेकडी तयार केली आहे. शेताकडे जाण्यास मार्गच ठेवलेला नाही. शेतकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांचा विरोध डावलण्यासाठी डंपर अंगावर घालून खून करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही घटनास्थळी जावून डेब्रिज माफियांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु प्रशासनाकडून नोटीस देण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. माफियांनी डेब्रिज टाकल्यामुळे येथील नैसर्गिक नालाही बुजला असून अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. महापालिका, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने शेतकºयांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
शेतकºयांना व आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी याविषयी अडवली भुतावली मधील डेब्रिजच्या विषयावर विधानसभेमध्ये आवाज उठविला आहे. या परिसरातील वनविभागाच्या जागेवरील जंगल नष्ट करण्याचा डाव असून तेथे टाऊनशीप उभारण्याचे षड्यंत्र सुरू आहे. तेथील शेतकºयांनी जमीन विकण्यास विरोध केल्याने त्यांच्या शेताभोवती डेब्रिज टाकले आहे. महापालिका व प्रशासनाकडे तक्रारी करूनही काहीही कारवाई केली नसल्याबद्दल म्हात्रे यांनी विधानसभेमध्ये नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी माफियांवर कारवाई करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अडवली भुतावली परिसरामध्ये वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झालेले नाही पण खाजगी जमिनीवर डेब्रिज टाकल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी डेब्रिज टाकण्यास महापालिकेने मनाई आदेश जारी केला आहे.
घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.