ऐरोली मतदारसंघ : निवडणूक प्रशिक्षणासाठी २१४ कर्मचाऱ्यांची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:19 AM2019-10-02T03:19:22+5:302019-10-02T03:19:40+5:30
ऐरोली मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणाला २१४ कर्मचारी अनुपस्थित होते. संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून, योग्य कारण न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
ऐरोली मतदारसंघाची निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात चार लाख ५९ हजार ८० मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जनजागृतीही सुरू केली आहे. निवडणुकीसाठी तब्बल २५०० अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहे. या कर्मचा-यांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर श्रीराम विद्यालयात आयोजित केले होते. या शिबिराला २१४ कर्मचारी उपस्थित नव्हते. याची गंभीर दखल घेत निवडणूक विभागाने अनुपस्थित असणाºयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून योग्य कारण न दिल्यास कारवाई केली जाणार आहे.
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्वीप हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे. तरुणांना मतदान करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
पनवेलमध्येही प्रशिक्षण
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. या वेळी ज्या अधिकारी व कर्मचाºयांची मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी अशी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांचे ईव्हीएम व व्हीव्हीपेट हाताळणी तसेच निवडणूक कार्यपद्धती बाबतचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात पार पडले. सकाळच्या सत्रात ७४१ कर्मचारी, तर दुपारच्या सत्रात ८१८ कर्मचारी उपस्थित होते.