अफगाणी लसूण मस्त; ‘देशी’पेक्षा भाव जास्त; किरकोळ मार्केटमध्ये ३८० रुपये दर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:04 AM2023-12-19T09:04:20+5:302023-12-19T09:04:31+5:30
देशात लसणाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी टंचाई आहे. चालू हंगामामधील साठा संपत चालला असून, बाजारभावाचा विक्रम झाला आहे.
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यातील सर्वच शहरांमध्ये लसणाच्या दरामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सध्या १२० ते २३० रुपयाने लसणाची विक्री होत आहे. पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी सर्वाधिक १०० ते २७० रुपये किलो भाव मिळाला. मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये ३०० ते ३८० रुपये दराने विक्री होत आहे. अफगाणीस्तानच्या लसणाची आवकही होऊ लागली असली तरी त्याचे दर मात्र देशी लसणापेक्षा जास्त आहेत.
देशात लसणाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी टंचाई आहे. चालू हंगामामधील साठा संपत चालला असून, बाजारभावाचा विक्रम झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी २२६ टन लसणाची आवक झाली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. देशी लसणाचे दर १२० ते १८० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. अफगाणीस्तानमधून आयात झालेल्या लसूणचे दर २०० ते २३० रुपये आहेत. यामुळे भाव कमी करण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. नवी मुंबईत किरकोळ मार्केटमध्ये लसूण सरासरी ३०० ते ३८० रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी चांगल्या दर्जाच्या लसणाची किंमत यापेक्षाही
जास्त आहे.
कांद्याची घसरण सुरूच
शासनाच्या निर्यातीबंदीच्या निर्णयामुळे कांद्याची घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये गत आठवड्यात कांदा २५ ते ४५ रुपये किलो दराने विकला जात होता. सोमवारी १२०० टन आवक झाली असून, कांद्याचे दर १३ ते २९ रुपये एवढे कमी झाले आहेत. बाजार समिती संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की, निर्यातबंदीमुळे दर कमी झाले असून, नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यामुळेही दरात घसरण झाली आहे.
राज्यातील लसणाचे प्रतिकिलो बाजारभाव
बाजार समिती बाजारभाव
मुंबई १२० ते २३०
पुणे १०० ते २७०
सोलापूर ११५ ते २२०
अकलूज १५० ते २००
हिंगणा २२० ते २५०
नाशिक ७५ ते २०१
सांगली १२५ ते २२६
नागपूर १६० ते २४०