नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी भारताची बचाव मोहीम सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या विमानांद्वारे अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशात आणलं जात आहे. या बचाव मोहीमेला ऑपरेशन देवी शक्ती असं नाव नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या मोहिमेचं कौतुक करत भारतीय नागरिकांना धीर दिला आहे. आता, या मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं माजी मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी कौतुक केलंय.
अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे. भारत सरकारच्या या यशस्वी मोहिमेबद्दल कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. तसेच, अफगाणिस्तानमधील पीडित नागरिक कुठल्याही जातीधर्माचा असला तरी त्यांची भारताने मदत केली पाहिजे. देशाचं संविधान या नागरिकांच्या सुरक्षेची परवानगी आपल्याला देते, असेही सिब्बल यांनी म्हटलं.
दरम्यान, अफगाणिस्तानमधील बिकट स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत अफगाणिस्तानधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी यावेळी भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासह भारतात येण्याच इच्छुक असलेल्या तेथील अफगाण शीख आणि हिंदुंनाही सुरक्षित आणण्याचे निर्देश दिले आहेत.
भारत-पाकिस्तान वादात अफगाणिस्तान नको
तालिबानचा नेता शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सीएनएन-न्यूज 18 ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्टनिकझाई म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकाळ चालणाऱ्या भौगोलिक आणि राजकीय वादाची आम्हाला जाणीव आहे. पण, भारत आणि पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत वादात अफगाणिस्तानचा वापर करू नये, असं स्पष्ट मत स्टनिकझाईने व्यक्त केलंय. तसेच, तालिबानला शेजारील देशांशी चांगले संबंध हवे आहेत, असेही त्याने म्हटले.