Afghanistan: तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवेत, प्रवक्त्याचंच स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 02:34 PM2021-08-16T14:34:02+5:302021-08-16T14:35:51+5:30
१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे.
नवी दिल्ली - अमेरिकेनंतर अफगानिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्राध्यक्षांनी राजीनामा देऊन पलायन केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने अब्जावधी रुपये खर्च करून गेली २० वर्षे तालिबानला (Taliban) सत्तेपासून लांब ठेवले होते. तालिबानने बलाढ्य अशा अमेरिकेलाही हरविले आहे आणि पुन्हा तालिबानी सत्ता स्थापन करण्याच्या टप्प्यात आहे. तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर (mullah abdul ghani baradar) हा अफगानचा पुढील राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता आहे. मात्र, तालिबानला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतात स्वातंत्र्याचा जल्लोष सुरू होता तेव्हा तालिबानचे सैनिक काबुल ताब्यात घेत होते. अफगाणिस्तानात सध्या तणावाची परिस्थिती बनली आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्यात येत आहे. दरम्यान, तालिबानकडून भारतासोबतच्या संबंधावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तालिबानचे प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी भारतासोबत चांगले आणि मजबूत संबंध हवेत, असे म्हटलं आहे. तसेच, अफगाणिस्तानात भारतातील उच्चायुक्तालयाचे अधिकारी सुरक्षित असून कुणालाही देश सोडून जाण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादात तालिबानचा कुठलाही हस्तक्षेप असणार नाही. दोन्ही देशांमधील समस्या ही त्यांची स्वत:ची आहे. त्यामुळे, यात हस्तक्षेप असणार नाही, असेही तालिबानकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.
दरम्यान, एएनआयच्या वृत्तानुसार, सध्या काबुल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवरील परिस्थितीत चिघळली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. राशिद यावेळी यूकेमध्ये आहे. जिथे द हंड्रेड लीगमध्ये ट्रेंट रॉकेट्स(Trent Rockets) यांच्याकडून तो खेळत आहे.
मागील २० वर्षापासून तालिबानचा अफगाणिस्तानशी संघर्ष
२००१ पासून तालिबान अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानशी लढाई करतोय. अफगाणिस्तानात तालिबानचा उदयही अमेरिकेच्या प्रभावामुळे झाला. आता तालिबान अमेरिकेसाठी मोठे डोकेदुखी बनला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती. तेव्हा अमेरिकेने स्थानिक मुजाहिद्दीनला हत्यारं आणि ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन दिले होते. सोव्हियत संघाने हार पत्करली परंतु अफगाणिस्तानात एका कट्टर दहशतवादी संघटना तालिबानचा उदय झाला.
सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजा होत्या. यांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने पुढे तालिबानची स्थापना केली.